आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोरी: मोदींच्या चाैकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सन २००३ मध्ये प्राप्तिकर विभागाच्या एका छाप्यात सापडलेल्या सहारा ग्रुपच्या डायरीत तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कथितरीत्या लाच दिली गेल्याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
प्रशांत भूषण यांनी यासंबंधीची याचिका दाखल केली असून विशेष तपास पथक नेमून या प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ एवढ्या आधारावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत. 

राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कायदेप्रक्रियेचा वापर नको
मुळात याचिकेसोबत दाखल करण्यात आलेली ही कागदपत्रे पुरावेच होऊ शकत नाहीत. त्याचा आधार घेऊन राजकीय हेतूसाठी कायदेप्रक्रियेचा गैरवापर केला जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने बजावले. ठोस पुराव्यांशिवाय एखाद्या उच्चपदस्थाविरुद्ध चौकशीचे आदेश दिले तर लोकशाहीलाच बाधा येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कोणत्याही प्रकरणात चौकशीचे आदेश दिले जात असताना न्यायालयांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषत: महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींसंबंधी असे निर्देश देताना ही काळजी घेतली गेली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 
काय आहे प्रकरण?
गुजरातमध्ये प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या एका छाप्यात सहारा ग्रुपच्या व्यवहारांविषयीचे उल्लेख असलेली डायरी सापडली होती. यात सन २००३ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना (नरेंद्र मोदी) २५ कोटी रुपये लाच दिली असल्याचे नमूद होते. त्यांच्याशिवाय अन्य तीन मुख्यमंत्र्यांची नावेही यात होती. या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणी प्रशांत भूषण यांनी याचिकेद्वारे केली होती.
 
हा निकाल सुप्रीम कोर्टावर डाग : प्रशांत भूषण
प्रशांत भूषण यांनी हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेवर काळा डाग असल्याचे ट्विट करून म्हटले आहे. भूषण म्हणतात, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान मोठमोठ्या गोष्टी करतात. मात्र, या प्रकरणात ते चौकशीला विरोध करत असल्याने त्यांच्याभोवती संशयाचे धुके कायम राहील.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...