आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीआयचे संचालक सिन्हा अडचणीत, व्हिजिटर्स डायरी जमा करण्याचे कोर्टाचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कोळसाखाण घोटाळ्यातील आरोपींची भेट घेतल्याचा आरोप असलेले सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांच्या घरातील व्हिजिटर्स डायरी शपथपत्रासह दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सिन्हा यांनी टू-जी आणि कोळसा घोटाळ्यातील आरोपींची भेट घेतली असल्याचा आरोप अॅड. प्रशांत भूषण यांनी बुधवारी न्यायालयात युक्तिवादादरम्यान केला होता.
टू-जी आणि कोळसा घोटाळ्यातील ज्या आरोपींनी सिन्हा यांची भेट घेतल्याचा आरोप होत आहे त्यात काँग्रेसचे राज्यसभेतील एक खासदार एका प्रख्यात उद्योगपतीचा समावेश असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. न्यायालयात तो संदर्भ आल्यानंतर न्यायालयाने व्हिजिटर्स डायरी सादर करण्याचे आदेश दिले. जोपर्यंत हे पुरावे मूळ दस्त म्हणून दाखल केले जात नाहीत तोवर यावर विचार केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील सुनावणी आता सोमवारी होत आहे. या संदर्भात प्रशांत भूषण यांनीही एक याचिका दाखल केलेली आहे.
सिन्हा यांची याचिका फेटाळली
आपल्या भेटीसाठी कोणकोणत्या व्यक्ती आल्या आहेत त्यांची यादी वृत्तपत्रांत प्रसिद्ध केली जाऊ नये, अशी विनंती करणारी याचिका रणजित सिन्हा यांच्या वतीने दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. आपल्यावर केले जात असलेले आरोप धादांत खोटे असल्याचा दावाही सिन्हा यांनी याचिकेत केला होता.
खासगी जीवन आहे की नाही?
सीबीआयसंचालक या नात्याने सिन्हा यांना भेटावयास आलेल्या बड्या लोकांची नावे आता बाहेर आली असली तरी आपल्या खासगी जीवनावर हा घाला असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे. काही लोक भेटावयास आले तर त्यांना नाही कसे म्हणणार, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. काही लोकांची नावे मोबाइल क्रमांक नोंदी करणाऱ्याने मुद्दाम पुन्हा पुन्हा टाकले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मीडियावर नियंत्रण नाही
सिन्हायांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, वृत्तपत्रांत जे काही प्रसिद्ध केले जात आहे त्यावर सर्वोच्च न्यायालय नियंत्रण ठेवू शकत नाही. दरम्यान, सिन्हा यांच्या वकिलांनी अॅड. प्रशांत भूषण यांच्यावर आरोप केला की, कोर्टाचे आदेश असतानाही त्यांनी सिन्हा यांची भेट घेतलेल्यांची काही नावे जाहीर केली आहेत. हा कोर्टाचा अवमान आहे.
सिन्हा यांना भेटण्यासाठी २०१२-१४ या कालावधीत त्यांच्याकडे आलेल्यांमध्ये अनेक दिग्गजांची नावे असल्याचे एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तात नमूद आहे. यात कोळसा घोटाळ्याचा आरोप असलेले राज्यसभेतील एक काँग्रेस खासदार, त्यांचा मुलगा (पाच वेळा सिन्हा यांची घेतली भेट!), एक माजी केंद्रीय मंत्री, हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा आदींचा समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या काही अधिकाऱ्यांनीही टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी या काळात सिन्हा यांची भेट घेतल्याचे स्पष्ट होत आहे.