आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वी प्रज्ञावरील ‘मकोका’ काढा, सुप्रीम कोर्टाचे आदेश; महिनाभरात जामीनावर निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मालेगावमधील २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर महिनाभरात निर्णय घ्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्रातील विशेष न्यायालयाला दिले.

या बॉम्बस्फोट प्रकरणातील राकेश धावडे हा आरोपी वगळता इतरांच्या जामीन अर्जावर निर्णय घेताना मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्यातील तरतुदींचा विचार करू नये, असा आदेशही न्यायमूर्ती एफ. एम. आय. कलिफुल्ला व न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने दिला.

विशेष न्यायालयाने प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहितसह इतर १० आरोपींवर ‘मकोका’नुसार ठेवलेले आरोप वगळले होते. मात्र या कायद्यानुसारच सुनावणी चालेल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. उच्च न्यायालयाने त्यांना जामीनही नाकारला होता. त्यामुळे आरोपींनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच ‘मकोका’बाबत निर्देश द्यावेत, अशी विनंतीही केली होती. यापूर्वीच्या अशाच एका प्रकरणात सहभागी असल्याने धावडेवर मात्र मकोकाचा आरोप कायम असेल.
हे आहेत आरोपी
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित, स्वामी दयानंद पांडे, अजय राहीरकर, राकेड धावडे, रमेश उपाध्याय, श्यामलाल साहू, शिवनारायण कलसंग्रा, सुधाकर चतुर्वेदी, जगदीश म्हात्रे आणि समीर कुलकर्णी.