नवी दिल्ली- मुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब अब्दुल रझाक मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने आज (गुरुवारी) कायम ठेवली. याकूबने फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. दरम्यान, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळला आहे.
याकूबला टाडा कोर्टाने 2007मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली. त्याला याकूबने टाडा कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने मार्च 2013मध्ये झालेल्या सुनावणीत टाडा कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर याकूबने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. परंतु, राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यावर याकूबने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली आणि कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, याकूब मेमन हा साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार व फरार आरोपी टायगर मेमन याचा भाऊ आहे. याकूबने अंडरवर्ल्ड डॉन
दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसोबत मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. याकूब मागील 20 वर्षांपासून तुरुंगातच आहे.
1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 निष्पाप लोकांचा मृत्यु झाला होता. तसेच 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटादरम्यान बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय दत्त पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे.