आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Says Compromise Is Not Acceptable In Rape Case

बलात्कारपीडित महिलेशी आरोपीची तडजोड अमान्यच, सुप्रीम कोर्टाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बलात्कार वा बलात्काराच्या प्रयत्नाच्या प्रकरणात मवाळ भूमिका अवलंबल्यास ती मोठी घोडचूक ठरेल. अशा प्रकरणात कोणतीही तडजोड वा मध्यस्थी मान्य नसल्याचा कठोर निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

अत्याचाराच्या एका प्रकरणात कोर्टाने म्हटले की, महिलेसाठी तिचे शरीर मंदिरासारखे असते. त्याच्याविरुद्ध झालेला गुन्हा तिची जगण्याची इच्छाच कमी करतो, तिच्या प्रतिष्ठेला हानी पाेहोचवतो. आरोपी पीडितेशी लग्नास तयार असल्याचे सांगून कधीकधी दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अशा तडजोडींनी कोर्टाने प्रभावित होऊ नये. अशा प्रकरणांत पीडिता आणि आरोपीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. दोघांत लग्नासाठी समझोता करणे ही घोडचूक आणि पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
मध्य प्रदेशातील गुना येथील मदनलालवर ७ वर्षीय बालिकेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ७ वर्षे शिक्षा सुनावली. मात्र, हायकोर्टाने पुरावे फेटाळून हे बलात्काराचे नव्हे तर, महिलांची प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी ताकदीचा वापराचे असल्याचे प्रकरण ठरवले. कोर्टाने मदनलालला एका वर्षाचीच शिक्षा सुनावली. ती आधीच भोगून झाली असल्याने त्याची सुटका करण्यात आली.

या निकालास राज्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. तेथे न्यायमूर्ती दीपक मिश्रा म्हणाले, हायकोर्टाने प्रकरणात सौम्य कलमे लावून चूक केली आहे. ते कायदेशीररीत्या योग्य मानले जाऊ शकत नाही. यामुळे हायकोर्टाने पुन्हा सुनावणी करावी. आपल्याच आधीच्या एका खटल्याचा संदर्भ देत कोर्ट म्हणाले, अत्याचाराच्या प्रकरणांत दोन्ही बाजूंत झालेली तडजोड शिक्षा कमी करण्यासाठी कारण मानली जाऊ शकत नाही.