आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Stays Madras HC Judge’s Order Against Chief Justice News In Marathi

मुख्य न्यायमूर्तींविरोधातील न्यायमूर्तींच्या आदेशाला स्थगिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आणि मुख्य न्यायमूर्ती यांच्यात सुरू झालेल्या अंतर्गत लढाईवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेताना वादग्रस्त न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांच्या ३० एप्रिलच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय कृष्ण कौल यांनी दिवाणी न्यायाधीशांच्या नियुक्तीचा आदेश काढला होता. त्याची स्वत:हून दखल घेत कर्णन यांनी या आदेशाला स्थगिती दिली होती.
मद्रास उच्च न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयाने न्यायमूर्ती कर्णन यांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने म्हटले आहे की, जोपर्यंत या प्रकरणाचा निपटारा होत नाही तोपर्यंत कोणतीही व्यक्ती, सरकार अथवा न्यायमूर्ती नियुक्ती प्रक्रियेत अडथळा आणणार नाही. न्यायपीठ आता सुट्यांनंतर त्यावर सुनावणी करेल.

प्रतिक्रिया पाहा, आम्हीही पाहत आहोत:
उच्च न्यायालयातील प्रबंधकांचे वकील के. के. वेणुगोपाल म्हणाले, न्यायमूर्तींच्या वर्तणुकीवर उच्च न्यायालय नाखुश आहे. त्यावर न्यायपीठ म्हणाले की, आम्हीही आदेश पाहिला आहेे. वेणुगोपाल आणखी काही मुद्दा उपस्थित करण्यापूर्वीच न्यायपीठाने म्हटले, ‘आधी तुम्ही प्रतिक्रिया पाहा.’
न्यायमूर्ती कर्णन नेहमीच असतात वादात
न्यायमूर्ती कर्णन पहिल्यांदाच वादात अडकलेले नाहीत. त्यांनी २०११ मध्ये सहकारी न्यायमूर्तींवर अपमानित करण्याचा आरोप लावला होता. गेल्या वर्षी जानेवारीत हायकोर्ट कॉलेजियमवर टीका केली होती. सध्याचा वाद तामिळनाडूत दिवाणी न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधी आहे. नियुक्तीत गैरव्यवहार झाला, असा कर्णन यांचा आरोप आहे. त्यांनी मुख्य न्यायमूर्तींना लिहिलेल्या दोन पत्रांत त्यांच्याविरोधात अवमानाचा कारवाई सुरू करण्याचा तसेच ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता.