आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC Stays Maharashtra Assembly\'s Privilege Motion Notice To Shobhaa De

शोभा डे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, हक्कभंगाच्या नोटीशीला स्थगिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त 'ट्विट' करणार्‍या स्तंभलेखिका शोभा डे यांना सुप्रीम कोर्टाने आज (मंगळवारी) दिलासा दिला. डे यांच्या विरोधातील हक्कभंगाच्या नोटीसीला कोर्टाने स्थगिती दिली आहे. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम देण्यासंदर्भात डे यांनी केलेल्या 'ट्वीट'मुळे विधानसभेचा अवमान कसा झाला? असा सवालही सुप्रीम कोर्टाने महाराष्‍ट्र सरकारला विचारला आहे.

शोभा डे यांनी या सरकारच्या नोटीशीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती दीपक मिसरा आणि प्रफुल्ल सी पंत यांच्या खंडपीठात शोभा डे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने महाराष्ट्र सरकारने डे यांना बजावलेल्या नोटीशीला स्तगिती दिली आहे. तसेच राज्य सरकारला नोटीस बजावत आठ आठवड्यात उत्तर मागितले आहे..

दरम्यान, मराठी चित्रपटांसाठी प्राईमटाईममध्ये एक शो सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवासंपूर्वी घेतला होता. या निर्णयाविरोधात शोभा डे यांनी वादग्रस्त 'ट्विट' केले होते.

फडणवीस सरकार हुकुमशहा असल्याचे शोभा डे यांनी म्हटले होते. यावरुन शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसही आक्रमक झाला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारत शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीसही बजावत एका आठवड्यात उत्तर मागितले होते.

शोभा डे यांच्यावर मराठी माणसांविरोधात टिप्पणी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावात म्हटले होते.

महाराष्‍ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका करणार्‍या शोभा डे यांना शिवसेनेने झणझणीत शिव वडापावसह दहीमिसळ भेट दिली. शिवसैनिकांनी त्यांच्या कफ परेड येथील घरावर मोर्चा काढून ‘शोभा आण्टी हाय हाय, शिव वडापाव पाहिजे काय’ अशा जोरदार घोषणा दिल्या होत्या.

शिवसेनेने शोभा डे यांना भेट दिलेल्या शिव वडापाव व दहीमिसळबाबत त्यांनी टि्वट केले. 'धन्यवाद, शिवसेना, फारच चविष्ठ!' असे डे यांनी टि्वट केले. शोभा डे यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांनी केली. मात्र, डे यांनी शिवसेनेलाच सुनावले होते. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून एका महिलेविषयी वापरलेली भाषा अशोभनीय आहे असे शोभा डे यांनी म्हटले होते.