आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टात आज 1984 शीख दंगल, चारा घोटाळा; पनामा पेपर्ससह या पाच प्रकरणांवर सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात आज 1984 शीख दंगल, चारा घोटाळा, मणीपूर येथील सुरक्षा रक्षकांकडून कथित हिंसाचार आणि पनामा पेपर्स घोटाळ्यास तीस्ता सेटलवाड प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपल्या तुरुंगवास विरोधात याचिका दाखल केली आहे. यासोबतच, 84 शिख दंगल प्रकरणी जगदीश टायटलर यांच्या लाय डिटेक्टर टेस्ट संदर्भात महत्वाचा निकाल येण्याची शक्यता आहे. 
 
चारा घोटाळा प्रकरणी सुनावणी
लालू प्रसाद यादव यांनी 90 च्या दशकात चारा घोटाळा प्रकरणी आपल्याला सुनावलेल्या तुरुंगवास विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केली आहे. चारा घोटाळ्यात बिहार सरकारच्या तिजोरीतून 9.4 अब्ज रुपयांच्या अपहार केल्या प्रकरणी झारखंड हायकोर्टाने लालू यांना तुरुंगवास दिला. ही शिक्षा कायम ठेवण्यासाठी सीबीआयने सुद्धा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
 
84 शीख दंगल प्रकरण
1984 च्या शीख दंगल प्रकरणी पॉल बंगाश शीख हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्या लाय डिटेक्टर टेस्ट संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या एका सुनावणीत टायटलर यांनी आपण लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार नसल्याचे सांगितले होते. सीबीआयने यापूर्वी टायटलर यांना क्लीनचिट दिली होती. मात्र, डिसेंबर 2015 मध्ये आर्म्स डीलर अभिषेक वर्माच्या चौकशीनंतर टायटलर यांच्या विरोधात नव्याने तपास सुरू करण्यात आला. 
 
मणीपूर हिंसाचार प्रकरणी सुनावणी
मणीपूरमध्ये 2000 ते 2012 पर्यंत पोलीस आणि सशस्त्र दलांनी केलेल्या कथित बेकायदा एनकाउंटर आणि हिंसाचार प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना जाब विचारत खडेबोल सुनावले होते. सशस्त्र दल आणि पोलिसांवर 12 वर्षांत 265 जणांना ठार मारल्याचे आरोप आहेत. 
 
तीस्ता सेटलवाड प्रकरण
सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी अहमदाबाद पोलिसांविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. सेटलवाड यांच्या 2 एनजीओंचे खाते पोलिसांनी सील केल्यानंतर त्यांनी ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 
पनामा पेपर्स घोटाळा 
जगभरात गाजलेल्या पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ वकील एम.एल. मिश्रा यांनी पनामा पेपर्सशी संबंधित तपास संस्थांनी बंद लिफाफ्यात दिलेल्या 6 अहवालांवर जनहित याचिका दाखल केली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ते करत आहेत. जगभरातील लाखो आजी-माजी नेत्यांसह सिलेब्रिटी आणि उद्योजकांचे परदेशातील अघोषित संपत्ती आणि कर बुडवेगिरीचा पनामा पेपर्समध्ये खुलासा करण्यात आला. यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह भारताच्या शेकडो नागरिकांचाही समावेश आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...