नवी दिल्ली - भारतीय शाळांमध्ये विज्ञान विषय अतिशय रटाळ पद्धतीने शिकवला जातो. ही पद्धती ‘कालबाह्य’ झालेली आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये अशा पद्धतीला अजिबात थारा नाही, अशा शब्दांत वरिष्ठ संशोधक आणि भारतरत्न विजेते सीएनआर राव यांनी देशातील शिक्षण पद्धतीवर शेरा मारला.
सध्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिकवण्यात येणारे विज्ञान हे विज्ञानाचे खरे स्वरूप नाही. प्रयोगशाळेतील विज्ञान वेगळे आहे. आपण जे शिकवतो, ते अत्यंत बोअरिंग आहे. ही पद्धती कालबाह्य झाली आहे. रसायनशास्त्रदेखील कोणाला शिकावे वाटेल? आपण शिकवण्याची पद्धती बदलली पाहिजे.
महत्त्व नाही म्हणून खंत
देशात शिक्षण आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले जात नाही. पी.व्ही. नरसिंह राव मनुष्यबळ विकास मंत्री होते. त्यावेळी देशाच्या शैक्षणिक राष्ट्रीय धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी मी त्यांना सहकार्य केले होते. त्यावेळी राव यांनी जीडीपीपैकी 6 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करण्यात यावी, अशी भूमिका मांडली होती. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर मात्र त्यांनी शिक्षणासाठी केवळ 2 टक्के एवढी तरतूद केली होती, याबद्दल संशोधक सीएनआर राव खंत व्यक्त केली.