आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Security System Responsible For Terrorist Aattac On Jammu, CM Report

सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे जम्मूत दहशतवादी हल्ला, मुख्‍यमंत्र्यांच्या आढावात स्पष्‍ट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळेच सांबा व कठुआ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी दुहेरी दहशतवादी हल्ला झाला असे आता समोर आले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय अधिकार्‍यांच्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेसंबंधी आढावा घेतला असता त्यात हे उघड झाले. या वेळी अब्दुल्ला यांनी अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली.

कठुआ आणि सांबा हे लष्कराच्या नवव्या कोरच्या अखत्यारीत येतात. त्याचे मुख्यालय योल येथे आहे. सकाळी 7.05 वाजता जम्मूच्या पोलिस महासंचालकांनी हिमाचल प्रदेशमधील योल येथील लष्कराच्या जनरल ऑफिसर इन कमांडला दहशतवादी हल्ल्याचा संदेश पाठवला होता. परंतु दहशतवाद्यांना रोखण्यासाठी तत्काळ हालचाली करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अतिरेकी लष्कराच्या कारनैटिक वॉरियर्समध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी झाले. तत्पूर्वी अतिरेक्यांनी हिरानगर पोलिस ठाण्यावर हल्ला केला होता.

दरम्यान, रविवारी नवाझ शरीफ यांच्या भेटीवेळी जाब विचारता यावा म्हणून दहशतवादी हल्ल्याचा अहवाल पंतप्रधान मनमोहनसिंग यांना न्यूयॉर्कला पाठवण्यात आला आहे.संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी उभय नेते अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल विक्रमजितसिंह यांच्यासोबत लष्कराचे चार जवान, चार पोलिस व दोन नागरिक शहीद झाले.
व्यवस्थेतील त्रुटींबद्दल अधिकार्‍यांची कानउघाडणी

दहशतवाद्यांची ओळख पटली नाही
हल्ला करणार्‍या विशीतील दहशतवाद्यांची ओळख पटू शकली नाही. शुक्रवारी चक मंगा येथे त्यांचा दफनविधी करण्यात आला.त्यांच्याकडे मोबाइल फोन वगैरे मिळाले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते तिघेही इअरफोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. तिघा अतिरेक्यांच्या कानात ब्ल्यूटूथ होते. एका ऑटोचालकाकडून त्यांनी दोन फोन हिसकावले होते. तेसुद्धा मिळाले नाहीत.

विक्रमजित यांना निरोप
लेफ्टनंट कर्नल विक्रमजितसिंह (39) यांना शुक्रवारी राजकीय व लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक आठवर्षीय मुलगी आहे. त्यांचे पिता निवृत्त मेजर परमजितसिंह यांनी चितेला अग्निडाग दिला. तत्पूर्वी जवानांच्या पार्थिवांना शुक्रवारी जम्मू विमानतळावर लष्करी मानवंदनेसह निरोप देण्यात आला होता.


भारतासोबत दृढ संबंध हवेत : शरीफ
सीमेवर सातत्याने कुरापती करणार्‍या पाकिस्तानने शुक्रवारी पुन्हा साळसूदपणाची भूमिका घेतली. आम्हाला भारतासोबत दृढ संबंध हवे आहेत. संवेदनशील काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवण्यात यावा, असे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देश संरक्षणावर प्रचंड खर्च करतात. दोन्ही देशांनी एकत्र यावे, असे शरीफ म्हणाले.

ठिकठिकाणी निदर्शने
दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जम्मूसह दिल्लीवर देशाच्या इतर भागात राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटना शुक्रवारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. भाजप, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते.