आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमेहरच्या मुद्द्यावरून गंभीर-सेहवाग सामना; गंभीर गुरमेहरच्या बाजूने, सेहवाग बचावात्मक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर उघडपणे विचार मांडल्यामुळे चर्चेत आलेली दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरच्या समर्थनार्थ क्रिकेटपटू गौतम गंभीर बुधवारी मैदानात उतरला, तर गुरमेहरची थट्टा केल्यामुळे होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग मात्र बचावात्मक बनला आहे. 
 
गौतम गंभीरने या प्रकरणी अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे. युद्धाच्या भीषणतेबाबत शहिदाची मुलगी गुरमेहरच्या दृष्टिकोनाची थट्टा करणे किंवा तिला ट्रोल करणे अत्यंत घृणास्पद होते. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य पूर्ण आणि सर्वांसाठीच आहे, असे ट्विट गंभीरने केले आहे. भारतीय सैन्याबाबत माझ्या मनात प्रचंड आदर आहे. परंतु नजीकच्या काही घटनांनी मला निराश केले आहे, असे गंभीरने म्हटले आहे. गौतम गंभीरचा या मुद्द्यावरील दृष्टिकोन माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागपेक्षा अगदी विरुद्ध आहे. 

विशेष म्हणजे हे दोघे टीम इंडियासाठी प्रदीर्घ काळ सलामीची जोडी म्हणून खेळले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अभाविपविरुद्ध सोशल मीडियावर मांडलेली भूमिका आणि भारत- पाकिस्तानदरम्यान शांतता प्रस्थापनेची वकिली करणाऱ्या व्हिडिओ अभियानामुळे गुरमेहर कौरला सोशल मीडियावर प्रचंड कडवट टिप्पणींना सामोरे जावे लागले आहे. सेहवागने अनेक ट्विट करून स्वत:चा बचाव केला. गुरमेहर कौरच्या पोस्टच्या उत्तरादाखल सोशल मीडियावर आपण केलेली पोस्ट  केवळ गंमत होती. कोणाला धमकावणेही नव्हते. सहमती आणि असहमतीचाही विषय नव्हता, असे सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे.  
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान हवाच : विद्या बालन  
दिल्ली विद्यापीठात जे काही होत आहे, त्याबद्दल मला काही बोलायचे नाही; परंतु लोकांनी इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे. आपण जो विचार करतो, ते सर्व करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे, असे अभिनेत्री विद्या बालनने म्हटले आहे.
 
अभाविपचे दोन कार्यकर्ते निलंबित 
आयसा समर्थक विद्यार्थ्यांच्या गटावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत मिश्रा व विनायक शर्मा या अभाविपच्या दोन सदस्यांना बुधवारी संघटनेतून निलंबित करण्यात आले आहे.  

आम्ही एका स्वतंत्र देशात राहतो. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आपले वडील गमावलेली एखादी मुलगी जर शांततेच्या हेतूने युद्धाच्या भयावहतेबाबत पोस्ट करत असेल तर  तसे करण्याचा तिला संपूर्ण अधिकार आहे. तिच्याशी कोणी सहमत किंवा असहमत असू शकते; पण तिची खिल्ली उडवणे घृणास्पद -गौतम गंभीर, क्रिकेटपटू.  
 
गुरमेहरला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही भीतीविना आपले विचार मांडता अाले पाहिजेत. मग ती गुरमेहर कौर असो की फोगट भगिनी - वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू. 
बातम्या आणखी आहेत...