आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडलेल्या 57% अधिकाऱ्यांचा बीएसएफच्या नोकरीस नकार; 10 टक्के पदे रिक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सीमा सुरक्षा दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झालेल्या ५७ टक्के तरुणांनी बीएसएफमध्ये नोकरी करण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या सीमेलगत डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस निगराणी करणाऱ्या या सुरक्षा दलात अधिकाऱ्यांची १० टक्के पदे रिक्त आहेत.
  
२०१५ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत एकूण २८ उमेदवारांची निवड झाली होती. त्यांना २०१७ मध्ये असिस्टंट कमांडंट पदावर रुजू होणे अपेक्षित होते. परंतु त्यापैकी १९ जणांनी नोकरी करण्यास नकार दिला. त्यामुळे बहुदा त्यांना निमलष्करी दलाच्या आगामी कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही. त्यानंतरही या उमेदवारांनी दलात रुजू होण्यास नकार दिला आहे.

बीएसएफसमोर गेल्या अनेक दिवसांपासून अधिकारी पदासंबंधी समस्या आहे. २०१४ मध्ये परीक्षेत ३१ जणांची निवड झाली होती. २०१६ मध्ये त्यापैकी केवळ १७ जणांनी प्रत्यक्ष रुजू होण्याची तयारी दर्शवली. २०१३ मध्ये परीक्षेत निवडलेल्या ११० पैकी ६९ जणांनी बीएसएफची नोकरी स्वीकारली. परंतु प्रशिक्षणादरम्यान पुन्हा १५ जण नोकरी सोडून निघून गेले. बीएसएफमध्ये असिस्टंट कमांडंटची एकूण ५ हजार ३०९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५२२ रिक्त आहेत, असे गृह विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

कठीण भागात तैनाती  
बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपीमध्ये सैनिकांची अत्यंत कठीण ठिकाणी तैनाती होते. त्यामुळे बहुतांश उमेदवार परीक्षेत निवड झाल्यानंतर अशा ठिकाणी जाण्याची तयारी दर्शवत नाहीत. त्यांची मानसिक तयारी दिसून येत नाही.  

सीआयएसएफला पहिली पसंती  
नोकरी नाकारणारे विवेक मिंज म्हणाले, बीएसएफ माझी पसंती नाही. सीआयएसएफसाठी निवड झाली असती तर त्या सुरक्षा दलात सेवा करण्यास तयार आहे. माझे ध्येय सनदी अधिकारी होण्याचे आहे. सीआयएसएफची नोकरी शहरात असते. त्यामुळे मला पुढील शिक्षण घेणेही शक्य होईल. त्याचवेळी अन्य एक परीक्षार्थी म्हणाला, बीएसएफमध्ये बढतीसाठी अनेक अडथळे येतात. नोकरी सोडणारा एक व्यक्ती म्हणाला, बीएसएफच्या जवानांपेक्षा जनतेच्या मनात लष्कराबद्दल अधिक सन्मानाची भावना आहे. आणखी एक म्हणाला, मुलीसाठी मुलगा पाहतानादेखील मुलीकडील लोक बीएसएफ नव्हे तर लष्कराच्या सैनिकाला पसंती देतात.  
बातम्या आणखी आहेत...