आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम दावेदारीबाबत भाजपने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जेडीयूचा \'सबुरी\'चा मंत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवारीवरून भाजप-संयुक्त जनता दलातील (जदयू) ताणाताणी चांगलीच वाढली आहे. दिल्लीत आजपासून सुरू होणार्‍या जदयूच्या राष्ट्रीय अधिवेशनात मोदींविरुद्ध प्रस्ताव संमत केला तर युती मोडून टाकू, असा करडा इशारा भाजपने दिल्यानंतर नितीशकुमार यांच्या जेडीयूने हा विषय फार ताणून न धरण्याचा निर्णय घेतला आहे. जेडीयूचे सरचिटणीस व राज्यसभेतील खासदार केसी त्यागी यांनी म्हटले आहे की, आमचा पक्ष पंतप्रधानपदाच्या उमेदवार निवडीबाबत भाजपला आणखी 6-7 महिन्याचा वेळ देऊ शकते.
राजनाथसिंह यांनी मोदी यांना धर्मनिरपेक्ष संबोधले असतानाच भाजपने पीएम उमेदवारीबाबत नितीशकुमार यांना स्पष्ट संदेश देण्यात बोलले जाते. त्यामुळेच जेडीयूचे सध्या हा विषय ताणून न धरण्याचे ठरवल्याचे दिसून येत आहे.
जदयूचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आज दिल्लीत झाले आहे. यात एनडीएकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार त्वरित घोषित करण्याच्या मागणीबाबत प्रस्ताव पारित होऊ शकतो. या पदासाठी एखाद्या धर्मनिरपेक्ष व्यक्तीचे नाव समोर आणण्यावर जोर दिला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, नितीश सर्मथक या प्रस्तावात नरेंद्र मोदींच्या नावाचा समावेश करण्यास इच्छुक आहेत. यामुळे बिहारमध्ये नितीश यांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा आणखी मजबूत होईल, असे त्यांना वाटते. या घडामोडीनंतर भाजपनेही कठोर भूमिका अवलंबली आहे.
नाव नसेल तर आक्षेप नाही- जदयूने जर कुणाचेही नाव न घेता प्रस्ताव पारित केला तर भाजपला आक्षेप नाही. पक्षाला फक्त आपल्या एखाद्या नेत्याच्या नावाबद्दल आक्षेप आहे.
जेटलींवर जबाबदारी- लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएतील एकजूट कायम राखून ठेवण्याची जबाबदारी राज्यसभेतील भाजपचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्यावर सोपवण्यात आली आहे. राजकीय प्रस्तावावरून तंटा उद्भवू नये म्हणून जेटली हे नितीश यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
भाजप ठाम- जदयूने मोदी यांचे नाव घेऊन धर्मनिरपेक्ष पंतप्रधानपद उमेदवारासंबंधी प्रस्ताव पारित केला तर त्यांच्यासोबतची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. सहकारी पक्षच जर आपल्या पक्षाच्या एखाद्या नेत्यास जातीयवादी संबोधू लागले तर ते असह्य आहे, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे युती करण्याला अर्थच उरत नाही.
मोदींच्या तुलनेत टायटलरवरील आरोप गंभीर नाहीत- नरेंद्र मोदी यांच्या तुलनेने टायटलर यांच्यावरील आरोप फार गंभीर नाहीत, मात्र शीखविरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदीश टायटलर यांना अजिबात पाठीशी घालण्यात येणार नाही. कायदा आपले काम करेल, असे शुक्र वारी पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कायदा त्याचे काम करेल, असे मोईली म्हणाले.