आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांच्या दौ-यांत सप्तस्तरीय सुरक्षा, राजपथावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षाजवळ सतर्कता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला २६ जानेवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने देशातील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. राजधानीत राजपथावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या कक्षाजवळ तर सात स्तरांची अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

एखादे अमेरिकी अध्यक्ष भारतीय प्रजासत्ताकदिनाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ओबामांसोबत येणा-या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि दिल्लीतील सोहळा सुव्यवस्थित पार पडावा म्हणून जमिनीपासून आकाशात प्रत्येक कोपरा सुरक्षा यंत्रणेने सज्ज असेल. यामुळे राजधानीला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप येईल.

ओबामा यांच्या भेटीदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचरांनी वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकी गुप्तहेर संस्थांचे पथकही राजधानी दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांनी ओबामा यांच्या मार्गावरील सुरक्षेचा आढावा घेतला.मुख्य समारंभस्थळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ओबामा यांची आसनव्यवस्था असेल. ओबामा बुलेटप्रुफ वाहनाने समारंभस्थळी उपस्थित राहणार आहेत.
या वेळी सात स्तरांची सुरक्षा व्यवस्था असून रडारद्वारे हवाई सुरक्षाही पुरवण्यात येणार आहे.
कडक तपासणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आपली दहशतवादविरोधी पथकातील गुप्तहेर दिल्लीत बोलावले असून अनेक हॉटेल्स, विश्रामगृहांना आकस्मिक भेट देऊन त्यांची तपासणी केली जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही ‘स्वच्छता’
भारताची मंगळयान मोहीम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडदरम्यानच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य अाकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील सहा शाळा आणि विविध सांस्कृतिक केंद्रातील सुमारे १२०० विद्यार्थी या वेळी पारंपरिक नृत्ये सादर करतील.

नाथपुराच्या शासकीय माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनी ‘स्वच्छ बनाये भारत’ या विषयावर आपले सादरीकरण देणार आहेत. आपल्या सादरीकरणाच्या माध्यमातून आधुनिक स्वच्छता अभियान कसे राबवले जाऊ शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार आहेत, अशी माहिती दिल्ली शिक्षण महासंचालनालयाचे अतिरिक्त संचालक सतपाल यांनी दिली आहे. दिल्लीच्या रेड रोझ पब्लिक शाळेमार्फत मंगळयान अभियानासंदर्भात दोन मिनिटांचे सादरीकरण केले जाणार आहे, असेही ते या वेळी म्हणाले. परेडमधील अन्य कार्यक्रमांत क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित काही सादरीकरण असणार आहे. हे सर्व सादरीकरण साधारण २ ते ३ मिनिटांचे असतील.इतक्या कमी वेळेत विद्यार्थ्यांना मंचावर घेऊन येणे आणि परत पाठवणे याचे व्यवस्थापन कठीण असल्याचेही सतपाल यांनी या वेळी सांगितले.