नवी दिल्ली - एड्सला प्रतिबंध करण्यासाठी कंडोमपेक्षा संबंधांतील प्रामाणिकपणाच रामबाण उपाय असल्याचे सांगणारे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आता एका नव्या विधानावरून वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. शाळेतील लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्यात आली पाहिजे. त्याऐवजी शालेय अभ्यासक्रमात योग आणि मूल्यावर आधारित शिक्षण अनिवार्य करण्यात यायला हवे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वेबसाइटवर लिहिले असून त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.
हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीतील शाळांसाठीच्या त्यांच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये ही बाब मांडली आहे. शुक्रवारी त्यांचे हे विधान प्रकाशझोतात आले. त्यावरून वादंग माजताच त्यांनी घुमजाव केले. डॉ. हर्षवर्धन सध्या अमेरिकेत आहेत. तेथून निवेदन जारी करून त्यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ब्लॉगवरून वाद निर्माण झाला आहे, तो 2007 मध्ये लिहिण्यात आलेला आहे. यूपीए सरकारने किशोर शिक्षण कार्यक्रम आणला होता, त्यासंदर्भात हा ब्लॉग लिहिण्यात आला होता, असे डॉ. हर्षवर्धन यांनी या निवेदनात म्हटले आहे.
आधी कंडोमवरून वाद
यापूर्वी डॉ. हर्षवर्धन यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ‘एड्सवर नियंत्रण आणण्यासाठी कंडोमच्या वापराला नव्हे, तर पती-पत्नींतील संबंधांमधील प्रामाणिकपणा वाढवण्यावर भर द्यायला हवा,’ असे म्हटले होते. यावरून वादंग माजताच त्यांनी घूमजाव केले. मीडियाने मोडतोड करून आपले विधान प्रसिद्ध केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आधी बंदीचा आग्रह
‘शाळांमध्ये लैंगिक शिक्षणावर बंदीच घातली पाहिजे. त्याऐवजी योग आणि मूल्यशिक्षण अनिवार्य करावे’
आता घूमजाव
‘शाळांमध्ये लैंगिक शिक्षण आवश्यक आहे. एक डॉक्टर या नात्याने मी असे विधान करूच शकत नाही.’
भाजपचीही सारवासारव
प्रकरण पेटू लागलेले पाहून भाजपचे प्रवक्ते संजय कौल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. लैंगिक शिक्षणावर बंदी घालण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही, असे कौल म्हणाले.