नवी दिल्ली - सहकारी महिला पत्रकाराच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी ‘तहलका’चे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. तेजपाल यांनी आरोपी म्हणून बराच काळ तुरुंगात घातल्याचा आधार त्यासाठी ग्राह्य धरण्यात आला.
न्या. एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने मंगळवारी म्हटले की, तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तेजपाल यांना दीर्घकाळपर्यंत तुरुंगात ठेवले जाऊ नये. तेजपाल यांनाही निष्पक्ष सुनावणीचा हक्क आहे. न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला आठ महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश बजावले. तेजपाल सध्या अंतरिम जामिनावर होते. मंगळवारी त्याची मुदत संपणार होती. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोणाला बेमुदत काळासाठी तुरुंगात ठेवले जाऊ शकत नाही, असे न्यायपीठाने स्पष्ट केले. तेजपाल सध्या आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवणे अन्यायकारक होईल. तसे केल्यास ते त्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)