आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाह यांच्याकडून यंत्रणेचा गैरवापर,सिंघल यांची सीबीआयसमोर कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इशरत जहाँ एन्काउंटरप्रकरणी आरोपी असलेले गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी जी. एस. सिंघल यांनी गुजरात सरकारकडून पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आहे. माजी अधिका-याने सीबीआयसमोर कबुलीजबाब देताना गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी पोलिसांना एका युवतीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते, असा दावा काही वेबसाइट्सनी केला आहे. त्यामुळे अमित शाह पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
सिंघल यांनी सीबीआयला टेलिफोन कॉल डिटेल्सच्या अनेक नोंदी सोपवून वरील दावा केला आहे.त्यात शाह यांनी गुजरात पोलिसांचे तीन विभाग सीआयडी, गुन्हे अन्वेषण शाखा व दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांचा वापर करून एका अविवाहित युवतीच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. या कॉल डिटेल्समधून ही युवती नेमकी कोण होती? ती कोणत्या प्रकरणात आरोपी आहे? तिच्याकडून कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका होता का? आदी प्रश्नांचा उलगडा होत नाही. चर्चेचा तपशील ऑगस्ट - सप्टेंबर 2009 मधील आहे. कोब्रा पोस्ट डॉट कॉम व गुलेल डॉट कॉम नावाच्या पोर्टलने जारी केलेल्या फोनवरील संभाषणात सिंघल आणि अमित शाह यांचा वारंवार उल्लेख येतो. यात अमित शाह यांनी असे म्हटले आहे की, ‘साहेबांची अशी इच्छा आहे’. मात्र हे ‘साहेब’ कोण याचा उल्लेख त्यातून होत नाही. ही युवती बंगळुरू येथे राहत होती. आर्किटेक्चर असलेल्या या युवतीचे आई - वडील गुजरातचे आहेत.
अमित शाह यांनी सिंघल यांना ही युवती कुठे जाते?, कुणाला भेटते?, कुणासोबत बोलते? याचा तपशील देण्याचे आदेश दिले होते. इतकेच नव्हे तर या युवतीच्या विमान प्रवासात तिच्यासोबत अधिका-यांना पाठवण्यात आले होते. चर्चेदरम्यान अमित शाह ‘साहेबांची अशी इच्छा आहे’ असे वारंवार सांगताना दिसतात. यासंदर्भात प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोब्रा पोस्टचे अनिरुद्ध बहल, अ‍ॅड. प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय, अ‍ॅडमिरल रामदास, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन आदी उपस्थित होते.
वरिष्ठ आयपीएस अधिका-यांवरही ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश
वेबसाइटने केलेल्या दाव्यानुसार अमित शाह यांनी केवळ युवतीवर लक्ष ठेवण्यासाठीच पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग केला असे नव्हे, तर राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. ‘साहेबांना अशी शंका आहे की, ही युवती प्रदीप शर्माला भेटणार आहे’ असे शाह यांनी म्हटले आहे. त्यावेळी शर्मा हे भावनगर पालिकेचे आयुक्त होते. शर्मा यांना डी. जी. वंजारा यांच्यापेक्षाही जास्त काळासाठी तुरुंगात डांबा, असेही शाह यांनी बजावल्याचे यातून स्पष्ट होते. विशेष बाब म्हणजे यानंतर तीनच महिन्यांनी आयएएस अधिकरी प्रदीप शर्मा यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.