आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीची जबाबदारी घ्यावीच लागते, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्यात दंगल व तत्सम घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या हितसंबंधांना बाधा पोहोचली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना घ्यावीच लागते. ती कदापि नाकारता येत नाही. मग त्या प्रकरणाशी संबंध असो किंवा नसो, मुख्यमंत्री, गृहमंत्री किंवा प्रशासक यापैकी एका नात्याने त्या घटनेस जबाबदार असले पाहिजे. अंतिमत: राज्यातील नागरिकांचे संरक्षण हे इतिकर्तव्यच समजावे असे मी मानतो, अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादीचेे अध्यक्ष शरद पवार यांनी गुजरात दंगलप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. दरम्यान, मोदींशी आपले संबंध चांगले असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढविली आहे.
गुजरातमध्ये 2002 मध्ये उसळलेल्या जातीय दंगलींबाबत न्यायालयाने गेल्याच महिन्यात नरेंद्र मोदी यांना निर्दोष मुक्त केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आल्याने त्यावेळी भाजपने जल्लोष केला होता, तर काँग्रेसचा पार तिळपापड झाला होता. मोदी निर्दोष ठरल्याचे आपल्याला महाग पडू शकते, हे ओळखून काँग्रेसने पहिल्यापासूनच गुजरात दंगलीचा मुद्दा लावून धरला आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कालच हा मुद्दा काढून मोदींवर निशाणा साधला. मोदींना गुजरात दंगलीची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी टाळता येणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते. गुजरातमध्ये 2002 मध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यास मोदी जबाबदार आहेत किंवा नाही, याबाबत आपले मत काय, असा प्रश्न पवार यांना एका खासगी वृत्तवाहिनीने विचारला होता. त्यावर पवार म्हणाले, न्यायालयाचा निर्णय हा स्वीकारलाच पाहिजे. जेव्हा न्यायव्यवस्थेने काही भाष्य केले असेल तर ते तुम्हाला स्वीकारावेच लागेल.
एकट्या मोदींमुळे गुजरातचा विकास नाही :
गुजरात राज्याचा विकास हा एकट्या मोदींमुळे झालेला नाही. चिमणभाई पटेलांपासून अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यापूर्वी चांगले काम केले असल्याने आजचा हा विकास दिसत आहे. गुजरात किंवा महाराष्ट्र ही देशातील विकसित राज्ये असून, ती कोणत्याही एका मुख्यमंत्र्यामुळे विकसित झाली असे म्हणता येणार नसल्याचेही पवार म्हणाले.
दंगलीची जबाबदारी शेवटी मोदींचीच : पवार
गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या त्यास मोदी जबाबदार आहेत किंवा नाही, याबाबत आपले मत काय, असा प्रश्न पवार यांना एका खासगी वृत्तवाहिनीने विचारला होता. त्यावर पवार यांनी सावधपणे उत्तर देत चांगलाच संभ्रम उडवून दिला आहे.
मोदींशीही चांगले जुळते
मोदींबरोबर तुमचे समीकरण कसे जुळते, या प्रश्नावर पवार यांनी मोदींसह देशातील अन्य बहुतांश पक्षांच्या नेत्यांशी माझे व्यक्तिगत स्नेहसंबंध चांगले आहेत, असे पवारांनी नमूद केले.