आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar, Mamata Banerjee Should Come Back To Congress: Digvijaya Singh

शरद पवार, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमध्ये परतावे- दिग्विजयसिंहांची चतुर खेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात काँग्रेस विचारधारा जोपासण्यासाठी धर्मनिरपेक्ष व काँग्रेसी विचारसारणीच्या लोकांनी काँग्रेस पक्षात पुन्हा परतायला हवे. शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते काँग्रेसमध्ये परतल्यास पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी 'द इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत वरील वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षाला ज्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली होती त्या सर्वांनी काँग्रेसमध्ये परत यायला हवे तरच भाजपसारख्या जातीयवादी पक्षाचा मुकाबला करणे शक्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीत भाजपने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांना हिंदू आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यात यश आले. त्यामुळेच काँग्रेसचा दारूण पराभव झाला. भाजपचा एवढा मोठा विजय होईल व काँग्रेस इतका दारूण पराभव होईल असे मला वाटले नव्हते. माझ्यासाठी हे सर्व धक्कादायकच होते, असे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील मात्र काँग्रेसी विचाराच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे. लोकांतील नेत्यांना संधी दिली पाहिजे. हायकमांडने राज्या-राज्यात नेतृत्त्व लादायला नको आहे. कर्नाटकात सर्व आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांची निवड केली असे सर्वत्र घडायला हवे. राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात सर्वात जास्त वेळ घालविणे आवश्यक आहे. पक्षाला यश मिळाले की अपयश हे न पाहता सतत लोकांत गेले पाहिजे, असे मतही दिग्विजय सिंह यांनी मुलाखतीत मांडले आहे.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी काही प्रयोग केले ते करायला नको होते. तसेच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 2 जी व कोळसा घोटाळाप्रकरणी जे आरोप केले त्याचे अधिक चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देण्याची गरज होती. संसदेने व सरकारने ठरविलेल्या धोरणानुसार हे वाटप केले होते. मात्र, मनमोहन सिंग यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून ते देशाला पटवून देऊ शकले असते पण तसे झाले नाही. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यामुळे पक्षाला पराभव पत्कारावा लागला का या प्रश्नांवर त्यांनी नाही असे उत्तर दिले.