आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Lok Sabha Election, BJP, Divya Marathi

भाजपला अतिआत्मविश्वासाचा फटका बसेल : शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अतिआत्मविश्वासाचा फटका बसू शकतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. भाजपने 2004 च्या निवडणुकीत इंडिया शायनिंगचा नारा देऊन प्रचार केला होता. या वेळीही त्याच दिशेने प्रचार सुरू असल्याची टीका पवार यांनी केली.


एवढा हाय प्रोफाइल प्रचार करूनही भाजपला जादुई आकड्याच्या आसपासही पोहोचता येणार नसल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. भाजप जनतेच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा कसून प्रयत्न करत असल्यामुळे काँग्रेसनेही अधिक जोर लावणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. निवडणुकीनंतर समोर येणा-या चित्राचा विचार केला तर, आपल्याला स्थैर्य असण्याबाबत शंका असल्याचे पवार म्हणाले. देशात मोदींची लाट नसून एकट्या व्यक्तीच्या जोरावर प्रचार होऊ शकत नसल्याचे पवार म्हणाले. 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयींसारखे व्यक्तिमत्त्व असूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, असेही पवार यांनी सांगितले.


मीडिया मॅनेजमेंटचे कौतुक
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. तसेच प्रथमच अशा उमेदवारांच्या भाषणांचे थेट प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवर केले जात आहे. पंतप्रधानांनाही असे भाग्य लाभत नाही. यातून मोदींचे मीडिया मॅनेजमेंट प्रकर्षाने जाणवत असल्याचे पवार म्हणाले.


पंतप्रधानपदाची आशाच नाही
आपण पंतप्रधानपदावर विराजमान होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे पवारांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. माझा पक्ष देशभरात 34 जागा लढवत आहे. त्यापैकी 21 महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे अशा प्रकारची स्वप्ने पाहण्यात काहीही अर्थ नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.