आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या अमृतमहोत्सवाची चार महानगरांत जय्यत तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या १२ डिसेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. पवार हे देशातील वजनदार नेते आहेत, त्यामुळे त्यांना साजेसा त्यांच्या राजकीय कर्तृत्वावर दृष्टिक्षेप टाकता यावा, असा सोहळा दिल्लीत १० डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात आला आहे. याशिवाय मुंबई, पुणे आणि बंगळुरू येथेही दिमाखदार सोहळा वेगवेगळ्या तारखांना आयोजित केला जाणार आहे.
दिल्लीतील सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीतील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या सोहळ्याची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार डी. पी. त्रिपाठी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सायंकाळी वाजता हा सोहळा सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यात १२०० व्हीआयपींना आमंत्रित केले आहे. शरद पवारांच्या वाढदिवशी म्हणजे १२ डिसेंबर रोजी मुंबईतही भव्य सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्याची जबाबदारी सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बंगळुरू येथे १८ डिसेंबर रोजी आणि पुण्‍यात २० डिसेंबर रोजी अमृतमहोत्‍सव सोहळा पार पडत आहे.

मान्यवर नेत्यांची उपस्थिती
प्राप्तमाहितीनुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माकपचे सीताराम येचुरी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशिवाय बहुतांश राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या सोहळ्याला हजर राहणार आहेत.