नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबतची आघाडी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. सल्लामसलतीसाठी दिल्लीत गेलेल्या राज्यातील नेत्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीसाठी कोणत्याही सग्यासोयर्यांची शिफारस करू नका आणि सलग दोन वेळा निवडणूक हरलेल्यांना या वेळी उमेदवारीही दिली जाणार नाही, असे बजावले. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी 20 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
पवार यांनी गुरुवारी सायंकाळी राज्यातील नेत्यांची बैठक घेऊन रणनीतीबाबत चर्चा केली. अडीच तास चाललेल्या या बैठकीत प्रफुल्ल पटेल, आर.आर.पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी, खासदार सुप्रिया सुळे, उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2009 चा जागावाटपाचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले.
उठवळ विधानांवर सोनिया नाराज : सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या दीर्घ चर्चेचा वृत्तांत शरद पवार यांनी या नेत्यांना सांगितला.राष्ट्रवादीचे काही नेते आघाडी तोडू, अशी वक्तव्ये करीत असल्याचे सोनिया गांधी यांच्या कानावर गेले असून त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचेही शरद पवार यांनी नेत्यांना सांगितले.
लोकसभेसारखी गत नको
शरद पवार यांच्या 6 जनपथ येथील निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी राज्यातील नेत्यांची जवळपास अडीच तास बैठक झाली. आता
आपसात भांडण्याची ही वेळ नाही, जे काही कटू अनुभव आले असतील ते दूर सारून कॉँग्रेससोबत मिळून ही निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीसुद्धा आहे. लोकसभेसारखी अवस्था व्हायला नको, अशी समज पवारांनी दिली.
3-4 दिवसांत वाटाघाटी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटप करण्याबाबतच्या वाटाघाटी येत्या तीन-चार दिवसांत सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.या वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेस 2009 चा जागावाटपाचा फॉर्म्युला मान्य नसल्याचा मुद्दा लावून धरणार आहे.
पराभूत मतदारसंघ बदलून घेणार
सलग दोन वेळा हरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पुन्हा तिकीट दिले जाणार नाही आणि असे मतदारसंघ बदलून घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
144 जागांची मागणी रेटा
राज्यात याच आठवड्यात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा करा आणि 144 जागांचा मुद्दा रेटा, अशा सूचना पवारांनी दिल्या. असे असले तरी 10 ते 12 जागा वाढवून मिळू शकतात आणि राष्ट्रवादीही त्यावर समाधान मानेल, असे संकेतही पक्षाच्या गोटातून मिळाले.
अडून बसा, पण तुटू देऊ नका..
राष्ट्रवादी काँग्रेसने 144 जागांची मागणी केली आहे. इतक्या जागा मिळणार नाहीत, याची खात्री राष्ट्रवादी काँग्रेसलाही आहे. त्यामुळे 2009 च्या तुलनेत जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या मुद्दय़ावर अडून बसा, पण त्याचे पर्यवसान तुटण्यात होऊ देऊ नका, असा सल्ला पवारांनी नेत्यांना दिला.
विजयाचा कानमंत्र
- लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे भान ठेवून निवडणुकीला सामोरे जा.
- कोणत्याही परिस्थितीत राज्यातील सरकार हातून जाऊ द्यायचे नाही अशी रणनीती आखा, कॉँग्रेससोबत सख्य ठेवा.
- मंत्री,नेत्यांनी स्वत:चे मतदारसंघ न पाहता राज्याचे नेतृत्व करायचे आहे,याचे भान ठेवावे.