नवी दिल्ली -
सुनंदा पुष्कर प्रकरणाचा एक नवा पैलू प्रकाशात आला आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या दाव्यानुसार, सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट तयार केला जात असताना शशी थरूर एम्स प्रशासनाच्या संपर्कात होते. त्यांनी काही डॉक्टर्सना ई-मेल पाठवले होते. वाहिनीने ई-मेलच्या कॉपीच्या आधारे हा दावा केला आहे. या मेलद्वारे शशी थरूर यांनी डॉक्टरांना सुनंदा यांना नैसर्गिक मृत्यू आल्याचे पटवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. सुधीर गुप्ता यांनी माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व सीव्हीसीला पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी थरूर - एम्स प्रशासन यांच्यात झालेल्या ई-मेल संवादाच्या कॉपी पाठवल्या होत्या.
थरूर यांनी मेलमध्ये लिहिले होते : वाहिनीच्या सूत्रांनुसार एम्स निर्देशकांना 26 जानेवारी 2014 रोजी रात्री 9.52 ला मेल पाठवण्यात आला होता. ‘अनिल चढ्ढा या आपल्या मित्राच्या माध्यमातून मी एम्सच्या डॉ. मिश्रा यांना काही माहिती देऊ इच्छितो. तुम्ही शंका उपस्थित केली होती की, योग्य प्रमाणात पाणी व मीठ न घेतल्याने तिचा रक्तदाब कमी होऊ शकतो. हेच झाले असण्याची शक्यता आहे. कारण 2-3 दिवसांपासून ती व्यवस्थित आहार घेत नव्हती. एल्प्रेक्स घेतल्याने तिच्या हृदयाची स्पंदनेही मंदावली होती. तीन दिवस ती केवळ नारळपाण्यावर होती. तिच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढल्याची शक्यता आहे.’ सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची एक याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे.