नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी सोमवारी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुरजेवाला म्हणाले, या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. ही सर्वसामान्य भेट होती. वास्तविक शत्रुघ्न सिन्हा काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. त्यांनी या भेटीसंदर्भात बोलणे देखील टाळले.
भेट केवळ योगायोग आहे का
सध्या बिहार विधानसभा निवडणूक सुरु आहे. शत्रुघ्न सिन्हा बिहारचे खासदार आहेत. मात्र गृहराज्यात एवढी मोठी निवडणूक असताना सिन्हांना पक्षाने प्रचारापासून दूर ठेवले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाला अडचणीचे ठरतील असे अनेक वक्तव्य त्यांनी केले होते. अशा पार्श्वभूमीवर विरोधीपक्षाच्या नेत्याची त्यांनी घेतलेली भेट अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
सुरजेवाला काय म्हणाले
शत्रुघ्न सिन्हांसोबतच्या भेटीनंतर रणदीप सुरजेवाला म्हणाले, ही सर्वसाधारण भेट होती. राजकारणात वैयक्तित गाठी-भेटी देखील होत असतात. मी सिन्हांचा आदर करतो. त्यामुळे या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये.
सिन्हांचा पक्षाला सल्ला
काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हांनी पक्षाला पंचतारांकित हॉटेलमधील पत्रपरिषदांपासून दूर राहात सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा सल्ला दिला होता. एका ट्विटमध्ये ते म्हणाले होते, बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात पक्षाला मतदान वाढले आहे, अशा बातम्यांमुळे चिंता वाटत आहे. त्याशिवाय ते म्हणाले होते, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्षाने सन्मान राखला पाहिजे.