आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदीच कप्तान, पराभवाचे खापर त्यांच्यावरच : शत्रुघ्न सिन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार गुरुवारी थंडावला. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर जनतेचा कौल असेल, असे मानले जात असतानाच भाजपने मात्र हा दृष्टिकोन फेटाळून लावला आहे. पण ज्येष्ठ भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी जय -पराजय कप्तानाचाच असतो, असे सांगत दिल्लीतील यशापयश मोदींचेच असेल असे म्हटले आहे.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी शनिवारी मतदान व मंगळवारी मतमोजणी होईल. जनमत चाचण्यांत ‘आप’चे सरकार येण्याचे संकेत मिळताच भाजपमध्ये विरोधाचे आवाजांनी जोर धरला आहे.

केजरींनी दम दाखवला
शत्रुघ्न सिन्हा यांनी अरविंद केजरीवाल यांची स्तुती केली. ते म्हणाले, त्यांनी निश्चितच आपला दम दाखवून दिला आहे. तसे नसते तर प्रत्येक जण त्यांची चर्चा करताना दिसला नसता. केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने केलेल्या प्रचारालाही सिन्हा यांनी विरोध केला. राजकीय प्रतिस्पर्धी आपले शत्रू नसतात, असे ते म्हणाले.

मोदीच आमचे कप्तान !
जय किंवा पराजय कप्तानाचाच असतो. सगळीकडे मोदी लोकप्रिय आहेत. आता तेच पुढे असल्याने जनमताचा कौल माना की न माना पण जेथे ते असतील, तेथे सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे जाणारच. शेवटी ते आमचे कप्तान आहेत, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

बेदींबद्दल पक्षात नाराजी
सिन्हा म्हणाले, किरण बेदींवरून भाजपमध्ये नाराजी आहे. त्यांच्याऐवजी हर्षवर्धन हेच सीएमपदाचे उमेदवार असते तर चांगले झाले असते. त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे. पण आता मोठ्या नेत्यांनी बेदींना मैदानात उतरवलेच आहे तर आम्ही त्याचेही कौतुक करतो.