आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाजिया इल्मी काँग्रेस प्रवेशाच्या मार्गावर, दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पूर्वाश्रमीच्या आप नेत्या शाजिया इल्मी
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या पूर्वाश्रमीच्या नेत्या शाजिया इल्मी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अंतर्गत राजकारणाचा आरोप करत शाजिया यांनी आपमधून काढता पाय घेतला होता. गाझियाबादमधून त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. पण माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह (सध्याचे मंत्री) यांच्याकडून त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शाजिया सध्या दिल्ली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसतर्फे त्या निवडणूक लढवू शकतात. दिल्ली काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, शाजिया यांच्या संदर्भात हायकमांड निर्णय घेणार असून, कार्यकर्ते या निर्णयाची वाट पाहत आहेत. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार अरविंदरसिंह लव्हली यांनी मात्र या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

काँग्रेसबरोबर कौटुंबीक नाते
शाजियाच्या कुटुंबाचे सुरुवातीपासूनच काँग्रेसबरोबर नाते होते. त्यांचे मेव्हणे आरीफ मोहम्मद खान काँग्रेसचे माजी मंत्री होते. सध्या ते बहुजन समाज पार्टीमध्ये आहेत. टिव्ही पत्रकारिता केलेल्या शाजिया आप पक्षाचा चेहरा म्हणून ओळखल्या जात होत्या. अरविंद केजरीवाल यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. पण पक्षात एक गट निर्माण झाला असून, तो इतर सदस्यांशी चर्चा न करताच सर्व निर्णय घेत असल्याची तक्रार करत त्यांनी पक्षाला निरोप दिला होता. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने गेल्या महिन्यात शाजिया यांना पक्षात परतण्याची विनंती केली होती. तसेच अनेतकदा त्या पक्षात परतत असल्याच्या अफवाही उठल्या होत्या.