नवी दिल्ली- केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला जाईल, असे वक्तव्य शिवसेनेचे बुलडाणा येथील खासदार प्रताप जाधव यांनी मंगळवारी लोकसभेत केले. त्यासरशी आक्रमक झालेल्या विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
राष्ट्रीपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाच्या वेळी जाधव बोलत होते. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी सभागृहाच्या नोंदीतून हे वक्तव्य वगळण्यात यावे, अशी मागणी लोकसभेच्या सभापतींकडे केली.
या वक्तव्यात काही आक्षेपार्ह असल्यास ते कामकाजाच्या नोंदींतून काढून टाकण्यात येईल, अशी ग्वाही पीठासीन अधिकारी अर्जुन चरण सेठी यांनी दिली. यानंतरही विरोधी बाकावरील सदस्यांचे समाधान झाले नाही. बराच वेळ या मुद्द्यावर गोंधळ सुरू राहिला. तृणमूल काँग्रेस, राजद आणि काँग्रेसचे खासदार वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यामुळे लोकसभेचे कामकाज काही काळ तहकूब करावे लागले. लाल किल्ल्यावर भगवा किंवा तिरंगा झेंडा फडकवण्याचे विधान करणे योग्य नसल्याचे काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खारगे यांनी म्हटले आहे.