आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर ‘जय महाराष्ट्र’! एनडीएतून बाहेर पडण्याच्या शिवसेनेत हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटा)
नवी दिल्ली/ मुंबई - मोदी सरकारच्या पहिल्यावहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच शनिवारी रात्री शिवसेना-भाजपचे संबंध कमालीचे ताणले. आधी महाराष्ट्रातील सत्ता सहभागाचा निर्णय घ्या, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन भेटायला गेलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे रविवारच्या विस्तारात शिवसेनेच्या मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता कमीच आहे, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीतच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाठिंब्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद आणि २:१ मंत्रिपदे द्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. फडणवीस सरकार बुधवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी निर्णय घ्या आणि सत्तेत सहभागी करून घ्या, असाही शिवसेनेचा आग्रह आहे. तर आधी विश्वासदर्शक ठराव मंजूर होऊ द्या, मगच राज्यातील सत्तेत सहभागाचे पाहू, असे सांगत भाजपने शिवसेनेला मोदी सरकारमध्ये आणखी दोन मंत्रिपदे देऊ केली होती. ही मंत्रिपदे देताना सुरेश प्रभू यांचे एक नाव सुचवण्याचा आग्रहही भाजपने धरला होता. त्यामुळे शिवसेनेचे पित्त खवळले आणि रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकालाही सहभागी करून न घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

सत्ता सहभागावरून निर्माण झालेली कोंडी फुटत नसल्यामुळे यापूर्वी शिवसेनेने फडणवीस सरकारच्या शपथविधीवरही बहिष्कार टाकला होता पण ऐनवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दूरध्वनी केल्यानंतर उद्धव ठाकरे शपथविधी समारंभात सहभागी झाले होते. त्यामुळे रविवारी होणा-या मोदी सरकारच्या विस्तारातही शिवसेना ऐनवेळी सहभागी होण्याची शक्यताही सूत्रांनी बोलून दाखवली.

केंद्र व राज्यातही शिवसेना विरोधी बाकावर?
मोदींनी गितेंना टाळले
‘आधी महाराष्ट्रातील सत्ता वाटपाचा सोक्षमोक्ष लावा,’ असा उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार होते.पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ)त्यांनी वेळही मागितला होता. पण पीएमओने त्यांना वेळच दिला नाही. परिणामी शनिवारी रात्री गिते मुंबईला परतले.
शिवसेनेची भूमिका
फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाआधी राज्यातील सत्तावाटप निश्चित करा, मगच अन्य बाबींवर चर्चा करू.
हेतू : महत्त्वाची पदे पदरात पाडून घ्यावी. विश्वासदर्शक ठरावानंतर भाजपने झुलवत ठेवू नये, हा शिवसेनेचा मुख्य हेतू.
भाजपची भूमिका
केंद्रातील दोन मंत्रिपदे घ्या आणि राज्यात फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करा. मग राज्याचे पाहू.
हेतू : आपल्या मर्जीप्रमाणे राज्यातील सत्तावाटप करता यावे आणि महत्त्वाची पदे आपल्याकडेच राहावीत हा भाजपचा हेतू.
रिक्त मंत्रिपदांवर कोणाची वर्णी?
शिवसेनेच्या अनंत गितेंनी मंत्रिपद सोडल्यास आणि अनिल देसाई मंत्री होणार नसल्यास शिवसेनेच्या वाट्याची दोन मंत्रिपदे रिक्त होतील. सध्या नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे केंद्रात राज्याचे मंत्री आहेत. त्यात हंसराज अहिरांची भर पडेल. मग शिवसेनेच्या रिक्त होणा-या पदांवर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला स्थान मिळू शकते.
आता पुढे काय होऊ शकते?
*राज्यातील सत्तावाटपाबाबतचा निर्णय झाला नाही तर शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अनंत गिते राजीनामा देतील आणि शिवसेना राज्यात
विरोधी पक्षात बसण्याची घोषणा करू शकते.
पण : शिवसेनेने अद्यापही आशा सोडलेली नाही. त्यामुळेच दुपारी ४ वाजेपर्यंत शिवसेना वाट पाहणार आहे.
* भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राजनाथ व जेटली रविवारी ‘मातोश्री’शी संपर्क करून केंद्रात मंत्र्यांना शपथविधीसाठी पाठवण्याचा आग्रह धरू शकतात. तसे झाले तर शिवसेना जाऊही शकते.
पण : सुरेश प्रभूंच्या नावाचा आग्रह भाजप सोडण्याची शक्यता. शिवसेना प्रभू वगळता दोघांचा आग्रह धरू शकते.
*शिवसेना बाहेर पडल्यास राष्ट्रवादीच्या मदतीने फडणवीस सरकार विश्वास ठराव मंजूर करून घेऊ शकते. बदल्यात केंद्रात प्रफुल्ल पटेल व आणखी एकास मंत्रिपद शक्य.
पण : राष्ट्रवादीचा पाठिंबा अडचणीचा ठरण्याची भीती असल्याने भाजप शिवसेनेशी अजूनही तडजोड करू शकतो.