आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुय्यम वागणूक, शिवसेना नाराज; अनंत गितेंसह पक्षाचे खासदार ठाकरेंना भेटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अठरा खासदार असूनही शपथविधीच्या वेळी दुय्यम वागणूक दिली आणि एकमेव मंत्रिपद देताना तुलनेने दुय्यम दिले गेल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेचे मंत्री अनंत गिते आणि अन्य काही खासदार मंगळवारी उद्धव ठाकरेंना भेटले. ठाकरेही नाराज आहेत. पुढच्या धोरणाबाबत शिवसेना विचार करत आहे. तूर्तास संयम ठेवून गिते यांना पदभार स्वीकारण्यासाठी ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे वृत्त असून ते बुधवारी अवजड उद्योग मंत्र्यांचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे 18 खासदार आहेत, तर तेलगू देसमचे 14 खासदार आहेत. मात्र, गिते यांच्याआधी तेलगू देसमचे अशोक गजपती राजू यांना शपथ देण्यात आली. शिवाय राजू यांना नागरी विमान उड्डयन खाते देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीडीपीचा सन्मान केला. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा हे महत्त्वाचे खाते देण्यात येऊन त्यांचेही महत्त्व वाढवण्यात आले. त्या तुलनेत शिवसेनेला मंत्रिमंडळात ज्येष्ठतेत सतराव्या क्रमांकावर टाकण्यात आले. मंगळवारी जाहीर झालेल्या खातेवाटपातही शिवसेनेच्या पदरात अवजड उद्योग हे तुलनेने दुय्यम खाते देण्यात आले.

शिवसेनेच्या एका खासदाराने ‘दिव्य मराठी’ला सांगितले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदारांची चर्चा झाली आहे. पंतप्रधान मोदी जर राज्यातील भाजपच्या तुलनेत शिवसेनेला सन्मान देणार नसतील तर मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे टाळले जाईल. शिवसेना हा एनडीएचा घटक पक्ष राहील, मात्र लाभाचे कोणतेही पद स्वीकारायचे नाही असा निर्णय शिवसेना घेऊ शकते. त्यासाठी विस्तारापर्यंत वाट पाहिली जाईल.