आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shopping Websites Took Back Book Related To Sex Determination

लिंगनिश्चिती पुस्तकांवर ऑनलाइन बंदी, संकेतस्थळांनी विरोधानंतर हटवली पुस्तके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बालकांच्या लिंगनिश्चितीशी संबंधित पुस्तकांची ऑनलाइन विक्री करण्याचा निर्णय फ्लिपकार्टने मागे घेतला आहे. लोकांचा विरोध आणि एका ऑनलाइन याचिकेनंतर देशातील सर्वात मोठी ई रिटेलर कंपनी फ्लिपकार्टने त्यांच्या ऑनलाइन स्टोरमधील या विषयाशी संबंधित सर्व ई-बुक्स आणि पुस्तके हटवली आहेत. भविष्यात अशा प्रकारची पुस्तके किंवा कोणतीही सामग्री ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकली जाणार नाही, याची काळजी घेऊ, असेही फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

न्यायालयाकडूनही बंदी
लिंगनिश्चितीसंदर्भातील मजकुरावर बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यंदा जानेवारी महिन्यात दिले आहेत. याहू, गुगल आणि बिंगसारख्या सर्च इंजिनवर याबाबतच्या जाहिराती प्रसारित केल्या जाऊ नयेत. शिवाय, आधीपासून सुरू असलेल्या जाहिरातीही परत घ्याव्यात, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

नापतोलनेही हटवली पुस्तके
ऑनलाइन शॉपिंगची अन्य एक दिग्गज कंपनी नापतोल डॉट कॉम या कंपनीविराेधातही एका संस्थेने याचिका दाखल केली होती. त्यानंतर नापतोलनेही लिंगनिश्चितीशी संबंधीत पुस्तके हटवली आहेत.

१२ हजार लोकांचा विरोध
गर्ल्स काउंट या लैंगिक समानतेसाठी काम करणा-या संस्थेने फेब्रुवारीत "चेंट डॉट ओआरजी'वर ऑनलाइन याचिका दाखल केली होती. यास १२ हजार लोकांनी पाठिंबा दिला. फ्लिपकार्टचे सीईओ सचिन बन्सल व संस्थापक बिन्नी बन्सल यांनाही पत्र पाठवण्यात आले. समाजात मुलींऐवजी मुलांना प्राधान्य देण्याची मानसिकता ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील पुस्तकांमुळे वृद्धिंगत होत आहे. दरवर्षी ६ लाख स्त्री भ्रूण नष्ट होत आहेत. त्यामुळे गंभीर कारवाई करावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली.