आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिशीत खासदार, केंद्रात मोठ्या जबाबदा-या सांभाळणारे शुक्ल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल यांचे विद्याचरण शुक्ल हे दुसरे चिरंजीव. मोठा मुलगा श्यामचरण शुक्ल नंतरच्या काळात मुख्यमंत्री झाले आणि विद्याचरण शुक्ल वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी खासदार झाले. महासमुंद मतदारसंघात सर्वप्रथम निवडून आलेले शुक्ल आतापर्यंत 9 वेळा लोकसभेवर निवडून गेले. काँग्रेस तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी माहिती-प्रसारण, संरक्षण, गृह आणि परराष्‍ट्रव्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.


22 व्या वर्षी स्वत:ची कंपनी
शुक्ल यांनी 1951 मध्ये शिक्षण पूर्ण करून आॅलविन कॉपर प्रा. लि. ही स्वत:ची कंपनी स्थापन केली. त्या वेळी त्यांचे वय अवघे 22 वर्षांचे होते. मँगनीज आणि डॉलोमाइटचे उत्खनन ही कंपनी करायची. शिवाय जंगलांमध्ये फोटो
एक्सपेडिशन आणि सफारीचे आयोजनही कंपनीमार्फत केले जायचे.


पक्ष बदलले, पण प्रतिष्ठा कायम
1987 मध्ये शुक्ल यांनी राजीव गांधी यांना विरोध करून व्ही. पी. सिंह यांना पाठिंबा दिला. काँग्रेस सोडली. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री राहिले. मात्र, 1991 मध्ये ते पुन्हा स्वगृही परतले. त्यांना 2000 मध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्रिपद देण्यात आले. मात्र, त्यांना हे मान्य नव्हते. 2003 मध्ये पुन्हा काँग्रेस सोडून राष्‍ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेस सोडून राष्‍ट्रीय जनतांत्रिक पक्ष स्थापन केला. पण महिनाभरातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक लढवली, पण पराभव झाला. 2004 मध्येच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि अडीच वर्षांनी 2007 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


आणीबाणीत किशोरकुमारवर लादली बंदी!
इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात विद्याचरण शुक्ल माहिती-प्रसारण राज्यमंत्री होते. आणीबाणीच्या काळात इंद्रकुमार गुजराल यांना काढून शुक्ल यांच्याकडे या मंत्रालयाचा पूर्ण कार्यभार सोपवण्यात आला. तेव्हा त्यांनी किशोरकुमार यांच्या गाण्यावर दूरदर्शन तसेच रेडिओवर बंदी घातली होती. याचे कारण म्हणजे मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत गाण्यास किशोरकुमारने नकार दिला होता.