आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरु/नवी दिल्ली- कर्नाटकात नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांची शुक्रवारी बैठक झाली त्यात विरोधी पक्षनेते के. सिद्धरामय्या यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या हे विराजमान होतील. सिद्धरामय्यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिल्याने त्यांना हायकमांडकडून बक्षिस मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. येत्या सोमवारी सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
काँग्रेसने कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर नवा मुख्यमंत्री कोण? अशी चर्चा रंगली होती. काँग्रेसमधून विरोधी पक्ष नेते के. सिद्धरामय्या, केंद्रीय कामगारमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची नावे आघाडीवर होती. 224 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसने 121 जागांसह बहुमत मिळवले आहे. बंगळुरुमध्ये आज झालेल्या बैठकीत 70 आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या नावावर मोहर उमटविली. यावेळी ज्येष्ठ मंत्री ए. के. अँटोनी, राज्याचे प्रभारी मधुसुदन मिस्त्री, लुईझिनो फालेरो यांच्यासह केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उपस्थित होते.
कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामागे सिद्धरामय्या यांनी चांगलीच मेहनत घेतली होती. सिद्धरामय्या यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चांगला 'होमवर्क' केला होता. तसेच राज्यात काँग्रेस सत्तेवर येईल व पक्षाला 120 पेक्षा जास्त मिळतील, असे त्यांनी भाकीत केले होते. सिद्धरामय्या यांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसला तेथे 121 जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेल, असे बोलले जात होते. त्यातच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवनियुक्त आमदार ज्यांची निवड करतील तो मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य केले होते. आता तेथील आमदारांनी सिद्धरामय्या यांचे नाव पुढे केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सिद्धरामय्यांनी राहुल गांधी यांच्यासमवेत प्रचार दौरे केले होते. त्याचवेळी राहुल यांना सिद्धरामय्यांनी राज्यातील स्थिती स्पष्ट केली होती. त्यामुळे राहुल ब्रिगेडकडूनही त्यांचेच नाव पुढे असल्याचे कळते. मात्र, कधी काळी ते देवेगौडांच्या जनता दलात सामील झाले होते. त्यामुळे या गोष्टीचा त्यांना फटका बसतो की काय अशी चर्चा होती. मात्र तसे काही झाले नाही.
64 वर्षीय सिद्धरामय्या यांनी सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे. तसेच ते अलीकडे राहुल गांधी यांच्या जवळचे म्हणूनही गणले जावू लागले आहेत. मागील पाच वर्षापासून ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहत होते. याचबरोबर ते कुरुबा समाजाचे आहेत. कर्नाटकात लिंगायत आणि वक्कलिंगा या समाजानंतरचा सर्वात मोठा समाज कुरूबा या समाजाकडे पाहिले जाते. त्यामुळे जाती-पातीचे राजकारणही सिद्धरामय्यांना उपयोगी पडले.
मुख्यमंत्रीपदाबाबत सिद्धरामय्या यांनी सांगितले होते की, मी एक प्रबळ दावेदार आहे. मला बहुतेक सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. तरीही हायकमांड जे निर्णय घेतील ते आम्ही मान्य करु. मागील पराभावातून आम्ही बराच धडा घेतला असून, येथील जनतेला स्थिर, स्वच्छ व लोकाभिमूख सरकार हवे आहे. ते काम काँग्रेस पक्ष करेल.
याचबरोबर, सिद्धरामय्या आणि खर्गे यांच्याशिवाय कर्नाटकमधून मुख्यमंत्री होऊ शकतात, असे अनेक वरिष्ठ नेते आहेत. यात केंद्रीय पेट्रोलियमंत्री विरप्पा मोईली, लघु आणि मध्यम अवजड उद्योगमंत्री के. एच. मुनिप्पा, वक्कलिंगा समाजाचे व सहा वेळा विधानसभेत पोहचलेले डी. के. शिवकुमार, प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वरा, माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा समावेश आहे. मात्र सिद्धरामय्या आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी सरळ लढत झाली आणि सिद्धरामय्या यांनी त्यात बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.