नवी दिल्ली - नवज्योत सिद्धू अजून काँग्रेसमध्ये दाखलही झाले नाहीत; मात्र कॅप्टन अमरेंद्रसिंग यांच्या उत्तराने एक बाब स्पष्ट झाली. ती म्हणजे, ते निवडणूक लढवतील आणि काँग्रेस सत्तेवर आली तर मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद त्यांना नक्कीच मिळेल. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅ. अमरेंद्रसिंग यांनी सिद्धू आणि व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यावर दैनिक भास्करने त्यांच्याशी बातचीत केली...
-सिद्धू यांनी काँग्रेससमोर अशी कोणती मागणी ठेवली आहे? की त्यांना पक्षप्रवेश करण्यास अडसर निर्माण झाला आहे.
सिद्धू एका कॉमेडी शोमध्ये व्यग्र होते. आठवड्यातून दोन वेळा त्यांना मुंबईला जावे लागते. आता त्यांच्याशी बोलणी झाली आहेत. पक्षाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. कसलीही अडचण नाही. मात्र, या चर्चेत उपमुख्यमंत्रिपद किंवा अन्य कोणते पद हे ठरले नाही.
-तुमचे सरकार बनले, तर सिद्धू मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होतील काय?
होय, सिद्धू मंत्रिमंडळात जरूर असतील; पण कोणता विभाग किंवा पद याचा निर्णय सोनिया किंवा राहुल गांधी हेच घेतील.
-सिद्धूच्या पत्नीबाबत ठरले आहे काय? त्यांच्यासंदर्भात काेणता निर्णय झाला?
सिद्धू दांपत्याने या मुद्द्यावर चर्चा केली नाही अथवा त्यांच्या पत्नीचे नाव खासदार पदासाठी किंवा इतर कोणत्याही पदाबाबत ठरलेले नाही.
-तिकीट वाटपात तुमचे वजन किती चालले?
मी तिकीट वाटपाबाबत पूर्ण समाधानी आहे. गेल्या वेळी एखाद्या नेत्यास ५ किंवा १० नावे सुचवण्याचा कोटा होता. मग त्यांनी आपल्या मर्जीनुसार वाटप केले. गेल्या वेळच्या ३९ उमेदवारांवर माझा आक्षेप होता. युवक काँग्रेसला ८ तिकिटे देण्यात आली होती. या सर्व ४७ उमेदवारांपैकी केवळ ८ जण जिंकले होते. यामुळे आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही.
-तुम्ही व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत सांगत आहात. मग मुख्यमंत्री असताना का नाही केले?
लोकांना तामझाम आवडत नाही. ही समस्या लक्षात घेता लाल दिवा आणि व्हीआयपी कल्चर समाप्त करण्याची योजना बनवली आहे.