आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमली पदार्थ तस्करी रोखण्यासह भारत-नेपाळदरम्यान 8 करार, संबंध हिमालयाइतके प्राचीन- मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-नेपाळदरम्यान गुरुवारी ८ करारांवर स्वाक्षरी झाली. यामध्ये अमली पदार्थांच्या तस्करीवर निर्बंध हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांच्यादरम्यान सर्वंकष चर्चेनंतर आठ करारांवर सहमती झाली. क्षेत्रीय मुद्दे आणि धोरणात्मक प्रश्नांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
उभय देशांच्या संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना देऊबा यांचे भारतात आगमन झाले आहे. वास्तविकत: दोन्ही देशांचे संबंध केवळ सत्तरीत नसून हिमालयाइतके प्राचीन आहेत असे माेदी म्हणाले. परस्परांच्या विकासासाठी सहकार्य करणे हा मूळ मुद्दा असून नेपाळच्या विकासात भारत नेहमीच सहकार्य करत आला आहे.
 
नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले की, भारत-नेपाळ संबंधात संरक्षण आणि सुरक्षा धोरण हे कळीचे मुद्दे आहेत. मोदी-देऊबा बैठकीपूर्वी देऊबांना राष्ट्रपती भवनात मानवंदना देण्यात आली. नेपाळच्या नव्या राज्यघटनेनंतर निर्माण झालेल्या पेचाविषयी उभय नेत्यांत चर्चा झाली. राज्यघटना लागू करण्यात नेपाळ सरकारला अडचणी येत असतील तर भारत मदत करण्यास तयार असल्याचे मोदी म्हणाले. नेपाळच्या प्रत्येक नागरिकाचा विचार करूनच ही राज्यघटना अमलात आणणे अपेक्षित आहे, असे मोदी या वेळी म्हणाले. मधेशींचा राज्यवार पुनर्रचनेच्या सीमांना विरोध असून नेपाळ संसदेत राज्यघटना दुरुस्तीचे विधेयक २१ ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश बहुमताने संमत होऊ शकले नाही. त्यामुळे मधेशींच्या मागण्या पूर्ण करणे कठीण झाले आहे.  
 
देऊबा यांनी द बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिमस्टेक) आणि बीबीआयएन (बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ) करारांचे समर्थन करत यामुळे क्षेत्रीय विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. रामायण आणि बुद्धिस्ट पर्यटन सर्किटचा विकास उभय देशांसाठी लाभाचा असल्याचे मोदी म्हणाले. या दिशेने नेपाळनेही अधिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

पंचेश्वर प्रकल्पाची सुरुवात लवकरच होणार: मोदी  
उभय देशांच्या प्रमुखांनी या वेळी  कटाय्या-कुसाहा आणि रक्षल-परवानिप ऊर्जा पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाद्वारे नेपाळला अतिरिक्त १०० मेगावॅट वीजपुरवठा केला जाईल. पूर्वीपासून ३५० मेगावॅट पुरवठा होत आहे. पूरव्यवस्थापन आणि जलसिंचन प्रकल्पासाठी सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. पंचेश्वर प्रकल्पाची  (उत्तराखंड) सुरुवात यासाठी लवकरच केली जाईल, असेही मोदी म्हणाले. यामुळे दोन्ही देशांच्या जलसिंचनाचाही विकास होणार आहे.  

भारतविरोधी शक्तींना नेपाळमध्ये थारा नाही: देऊबा  
नेपाळ भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने १ अब्ज डॉलर्सची मदत केली असून त्या अंतर्गत नेपाळमध्ये ५० हजार घरकुले बांधण्यात येतील. शिक्षण, सांस्कृतिक वारसास्थळांची दुरुस्ती, आरोग्य सुविधांसंबंधी चार करार झाले. अमली पदार्थ निर्बंधासाठी त्यांची तस्करी रोखण्याविषयी करार झाला. मोदी -देऊबा संयुक्त पत्रपरिषदेत शेरबहादूर देऊबा यांनी म्हटले की, भारतविरोधी शक्तींना नेपाळमध्ये कदापि थारा देणार नाही. अमली पदार्थ तस्करी रोखणे नेपाळसाठीही महत्त्वाचे आहे. मोदी म्हणाले की, उभय देशांतील सीमा खुली आहे. त्यामुळे संरक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. संरक्षण करार भारतासाठी महत्त्वाचा ठरेल.
 
बातम्या आणखी आहेत...