आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजधानीत रंगली ‘दिवाळी पहाट'; प्रसिद्ध गायक महेश काळेंच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफलीने इंडिया गेटच्या लॉन्सवर शनिवारी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम झाला. राजधानीत प्रथमच दिवाळी पहाट कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला. या वेळी मराठी श्राेते माेठ्या प्रमाणात इंडिया गेटवर काळेंना ऐकण्यासाठी आले होते.

विविध क्षेत्रांत कार्यरत दिल्लीकर मराठी माणसांना एकत्र आणत दिवाळीची सुरेल भेट देण्यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले. केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ल्युटीयन झोन म्हणून एक वेगळी ओळख असणारा इंडिया गेट परिसर सकाळी सहापासूनच मराठमोळ्या संस्कृतीने नटलेला दिसत होता. पणत्या, रांगोळ्या आणि मोठ्या कमानी यांनी परिसर सजला होता. पहाटेची निरव शांतता राजधानीत प्रथमच पडलेलं धूक आणि गुलाबी थंडीची लाट अशात गायक महेश काळे यांच्या सुस्वरांनी येथील वातावरण उपस्थितांना परमोच्च आनंद दिला.

मैफलीच्या पूर्व रंगात ‘कृष्ण’ आणि ‘पांडुरंग’ यांच्या व्यक्तित्वाच्या छटा दर्शविणाऱ्या गीतांची उधळण आणि उत्तर रंगात नाट्यगीत,भावगीत,अभंग अशा सुरावटींचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. ‘शीतल चलत पवन यारी’ या शास्त्रीय संगीताने नटलेल्या गीताने मैफलीची सुरुवात झाली. ‘अलबेला सजन आयो रे’,‘सूर निरागस हो’, ‘माझे जीवन गाने’ या अविट गीतांनी मैफलीत रंग भरला. महेश काळे यांनी शास्त्रीय गायनाच्या अंगाने सादर केलेले ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या सुरावटींना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

साडेचार तासांचा कार्यक्रम
मैफलीच्या उत्तर रंगाची सुरुवात ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीताने झाली. यानंतर विविध भावगीते, आणि अभंग सादर झाले. कट्यार काळजात घुसली चित्रपटातील ‘अरुण किरण गगन चमके’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. जवळपास साडेचार तास हा कार्यक्रम चालला.
बातम्या आणखी आहेत...