आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sir, Please Save Andhra; Telegu Desam MLA Requesting To Jairam Ramesh

सर, प्लीज आंध्रला वाचवा;तेलगू देसम आमदारांची जयराम रमेश यांच्या पायाशी लोळण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजधानीत तेलंगणाच्या मुद्यावरून आंध्र प्रदेशातील आमदारांनी चांगलाच गोंधळ घातला.तेलंगणा विरोधक तेलगू देसमच्या 20 आमदारांनी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या पायावरच लोळण घेतली.अचानक झालेल्या या घटनेमुळे रमेश कावरेबावरे झाले.
निवडणुकीचा मोसमामुळे आंध्र प्रदेश विभाजनाच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्री जयराम रमेश मंगळवारी तेलंगणा विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी गृहमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक कार्यालयात आयोजित बैठकीसाठी आले होते. कार्यालयाच्या दरवाजाजवळ कारमधून उतरताच तेलगू देसमच्या 20 आमदारांनी चक्क त्यांच्या पायावरच लोळण घेतली. सर, प्लीज आंध्र प्रदेशला वाचवा.प्लीज, तेलंगणाची निर्मिती करू नका. काही तरी करा, अशी विनवणी ते करीत होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रमेश कावरेबावरे झाले. त्यांना काहीच सुचेना.त्यांची ही अडचण लक्षात घेऊन दिल्ली पोलिस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी रमेश यांना कार्यालयात पोहोचवले.तर दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री नारायणसामी यांच्या कारसमोर काही आमदारांनी लोळण घेतली.त्यापैकी काहीजणांनी लालदिवा फोडला. अखेर पोलिसांनी या आमदारांना हटवले. या आमदारांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंध्र प्रदेश विभाजनाचा मसुदा अांध्र विधानसभेने फेटाळला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला तेलंगणा निर्मितीप्रस्ताव संसदेत मांडणे घटनाबाह्य असल्याचा दावा तेलगू देसमचे आमदार पी.केशव यांनी केला. विधिमंडळ व संसदेचा समान दर्जा असल्याने विधिमंडळाच्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा अधिकार संसदेला नाही असे ते म्हणाले.
* 15 व्या लोकसभेचे अखेरचे सत्र आजपासून
*तेलंगणा मसुद्यास मंत्रिगटाची मंजुरी
15 व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन उद्या बुधवारपासून सुरू होत आहे. निवडणुका असल्यामुळे अर्थसंकल्पाऐवजी लेखानुदान पारित केले जाणार आहे. मात्र अधिवेशन तेलंगणाच्या मुद्यावरून गाजणार असल्याची चिन्हे आहेत. तेलंगणा विधेयक शांततेने पारित होईल असा विश्वास पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी व्यक्त केला. मंंत्रीगटाने तेलंगणा मसुद्याला मंजुरी दिली असून गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत आता हा मसुदा मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर तो संसदेत ठेवला जाईल. अधिवेशन 21 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
*25 खासदारांचा विरोध
आंध्र प्रदेशात 42 जागा असून यामध्ये तेलंगणाचे 17 खासदार असून त्यांचा तेलंगणानिर्मितीला पाठिंबा आहे.तर सीमांध्रच्या 25 खासदारांचा विरोध आहे.या खासदार व तेलगू देसमच्या 20 आमदारांनी मंगळवारी गृहमंत्रालयासमोर गोंधळ घातला.
*टीआरएस नेत्यांच्या दिल्लीत गाठीभेटी
तेलंगणा राष्ट्रसमिती (टीआरएस)चे नेते के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधानांची भेट घेतली. लोकांच्या भावना भडकतील असे काही करू नका.राज्याचे विभाजन शांततामय मार्गाने होऊ द्या असे मनमोहनसिंग यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. राज्यनिर्मितीनंतर तेलंगणात वीजटंचाई जाणवेल असे राव म्हणाले.
*रालोआ हेलिकॉप्टरचा मुद्दा उचलणार
संसदेच्या अधिवेशनात रालोआ ऑगस्टा वेस्टलँडचा मुद्दा उचलणार आहे. व्हिव्हिआयपी हेलिकॉप्टर सौद्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या जवळच्या सहका-यांशी संपर्क साधण्यास कंपनी इच्छुक होती असे नुकतेच उघडकीस आले आहे. 3600 कोटींच्या या सौद्यात 360 कोटींची लाच देण्यात आली होती.
* ग्रँड फिनाले सारखे सत्र : मीराकुमार
लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की,अखेरचे हे सत्र सदस्यांनी एकमेकांशी सहकार्य ठेवून ग्रँड फिनालेसारखे साजरे करावे.