नवी दिल्ली - काळा पैसाप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सामान्य नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले आहे. कोणीही भारतीय व्यक्ती कोणत्याही फर्मच्या विदेशातील बेकायदेशीर किंवा गोपनीय खात्यांची किंवा संपत्तीची माहिती देऊ शकेल. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
एसआयटीने यासंदर्भात जाहीर नोटीस काढली आहे. माहिती अचूक असावी, केवळ आरोप नसावा, असे त्यात म्हटले आहे. बिनचूक माहिती मिळणाऱ्या सर्व प्रकरणांत कारवाई केली जाईल, असे एसआयटीने म्हटले आहे. माहिती देण्यासाठी विहित नमुनाही देण्यात आला आहे. टपाल किंवा इ-मेलने ती पाठवण्याचे आवाहन आहे. एसआयटीचे प्रमुख न्यायमूर्ती एम.बी. शहा यांनी काही काळापूर्वीच यासंबंधी निवेदन दिले होते.
एखाद्याला काळया पैशाविषयी माहिती द्यायची असल्यास सोयीचे व्हावे अशी व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. काळ्या पैशाचा शोध घेण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीची स्थापना केली आहे.