आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SIT Established For The Check Sunanda Pushkar's Death

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यूच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून पथकाने चौकशी सुरू केली आहे. हे खुनाचे प्रकरण आहे असे प्रथमदर्शनी तरी दिसते, अशी टिप्पणी दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांनी केली. बस्सी म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीने कृती आराखडा तयार केला आहे. या प्रकरणाची उकल करण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्यात येईल.

शशी थरूर यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली नाही. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर जवळपास वर्षभरानंतर खुनाचे प्रकरण अशी नोंद का करण्यात आली, या पत्रकारांच्या प्रश्नावर बस्सी म्हणाले की, सुनंदा यांचे व्हिसेरा नमुने चाचण्यांसाठी परदेशात पाठवायचे आहेत. त्यासाठी ‘एम्स’च्या अंतिम अहवालासोबत एफआयआर दाखल होणे आवश्यक होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एसआयटी थरूर, त्यांचे नातेवाईक, वैयक्तिक कर्मचारी तसेच सुनंदा पुष्कर यांचा ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मृत्यू झाला त्या हॉटेलचे कर्मचारी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुनंदा पुष्कर यांना १२ ते १४ जानेवारी २०१४ दरम्यान तिरुअनंतपुरममधील केरळ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तीनच दिवसांनी त्या दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने २ डिसेंबरला या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची भेट घेतली आणि सुनंदा यांच्यावर कोणत्या आजाराचे उपचार सुरू होते याची माहिती घेतली. तेथील वैद्यकीय नोंदीची माहितीही डॉक्टरांकडून मागवण्यात आली आहे.
सुनंदा यांना त्वचाक्षय झाला होता आणि त्या मोठ्या प्रमाणावर औषधी घेत होत्या, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते. एम्सच्या डॉक्टरांनी मात्र त्यांना त्वचाक्षय झाला नव्हता, त्या निरोगी होत्या, असे म्हटले होते.