आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श उत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच हुशार, मेहनती विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत असतात. परंतु या विद्यार्थ्यांतही एक सर्वोत्तम विद्यार्थी ठरतो. ज्याला सर्वाधिक गुण प्राप्त होतात. ते त्यांनी केलेला सूत्रबद्ध, सुनियोजित पद्धतीचा अभ्यास आणि त्यांनी लिहिलेली वैशिष्ट्यपूर्ण आदर्श उत्तरे याच्या जोरावर.

सूत्रबद्ध, सुनियोजित पद्धतीने अभ्यास कसा करावा याची चर्चा आपण मागील काही लेखांत केली. आज आपण चर्चा करणार आहोत आदर्श उत्तरे कशी लिहावीत.

आदर्श व अचूक उत्तरे लिहिणे ही एक कला आहे आणि योग्य सरावाने तुम्ही ही कला साध्य करू सकता. सध्याचे जग हे प्रेझेंटेशनचे (सादरीकरण) आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये करार, चर्चा, बैठकीमध्येही प्रेझेंटेशनला फार महत्त्व आहे. ज्याच्याकडे प्रेझेंटेशन चांगले तो यशस्वी. हा आजचा मंत्र आहे आणि तुम्ही तर जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याची परीक्षा देत आहात, मग इथेही तुमचे प्रेझेंटेशन म्हणजेच तुमच्या उत्तराचे सादरीकरणच तुम्हाला यश देणार आहे.
तुम्हाला विषयाचे किती आकलन झालेले आहे हे तुम्ही उत्तर प्रत्रिकेमध्ये लिहिलेल्या उत्तरावरून परीक्षकांना समजणार आहे. उत्तराची योग्य व समर्पक मांडणी केली गेली तर इतरांपेक्षा हमखास जास्त गुण तुम्हाला मिळणार आहेत. उत्तरे नेहमी ठराविक साच्यात लिहावी की जेणेकरून तुम्हाला काय नेमके म्हणायचे आहे हे परीक्षकांना सहज कळेल. प्रत्येक उत्तराचे प्रामुख्याने 3 भाग करणे जरुरीचे आहे.

1) प्रस्तावना, 2) स्पष्टीकरण, 3) सारांश
1) प्रस्तावना : प्रस्तावना करताना तुम्ही त्या प्रश्नाची पार्श्वभूमी विशद केली पाहिजे की, जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न किती खोलवर समजला आहे हे कळून येईल. प्रस्तावना ही नेहमी थोडक्यात लिहा. प्रस्तावनेत तुमच्या उत्तराला साजेसा असा समर्पक सुविचार, काव्यपंक्ती याचा वापर करा की जेणेकरून इतरांपेक्षा तुमचे उत्तर अधिक आकर्षक होऊन तुमची हुशारी निदर्शनास येईल आणि तुमच्या अभ्यासपूर्ण उत्तराला हमखास जास्त गुण मिळतील.

2) स्पष्टीकरण : तुमच्या उत्तराचा विस्तार म्हणजे स्पष्टीकरण. हा उत्तरातील सर्वात महत्त्वाचा भाग. स्पष्टीकरण हे मुद्देसूद, सुसंगत आणि तर्कशुद्ध असावे. स्पष्टीकरणामध्ये विविध अवतरणांचा वापर केला पाहिजे स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करायला विसरू नका की जेणेकरून परीक्षकाचे लक्ष वेधले जाईल. आवश्यक असेल तिथे सुबक आकृत्या, समीकरणे यांचासुद्धा वापर करा की ज्यामुळे तुमचे स्पष्टीकरण अधिक समर्पक व आकर्षक होईल.

3) सारांश : सारांश लिहून प्रश्नाचा समारोप करा. सारांश करताना उत्तराच्या मूळ मुद्द्याचा थोडक्यात उल्लेख करून समारोप करावा. सारांश म्हणजे संपूर्ण उत्तराचा अर्क असे म्हणले तरी चालेल. म्हणून प्रस्तावना व स्पष्टीकरणामध्ये आलेल्या सर्व मुद्द्यांचा यथायोग्य मेल घालून उत्तराचा सारांश लिहावा.

त्याबरोबर विषयातील महत्त्वाच्या संकल्पना, घडामोडी त्याबद्दल पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त माहिती वेगवेगळ्या मार्गानी मिळवा आणि त्याचा वापर आपल्या उत्तरांमध्ये करा. यामुळे तुमची उत्तरे आदर्श तर ठरणारच आहेत. पण त्याचबरोबर तो विषय समजण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत व तुमची शिकावू वृत्तीही सहजगत्या परीक्षकाच्या निदर्शनास येईल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे चीज नक्कीच मिळेल.

आदर्श उत्तरामध्ये सुंदर हस्ताक्षराला विसरून कसे चालेल, आदर्श उत्तराची शान वाढवते ते सुंदर हस्ताक्षर. अक्षर सुंदर, सुवाच्च व शुद्धलेखनासहित असू द्या. सुंदर, सुस्पष्ट, सुटसुटीत अक्षर तुमची उत्तरपत्रिका इतरांपेक्षा आकर्षक तर बनवतेच पण त्याचबरोबरच तुमच्या व्यक्तिमत्त्वाची एक आगळीवेगळी छापही परीक्षकावर पाडते. तेव्हा सुरुवातीपासूनच आपले हस्ताक्षर सुंदर आणि सुवाच्च कसे होईल याकडेही लक्ष केंद्रित करा. योग्य व नियमित सरावाने अक्षर नक्कीच सुधारू शकते. हे ध्यानी ठेवा.

विषय कोणताही असो प्रश्न कोणताही असो, सोपा किंवा कठीण. उत्तरपत्रिकेत तुम्ही लिहिलेली उत्तरे, तुम्हाला त्या विषयाचे झालेले आकलन परीक्षकासमोर ठेवत असतात. तेव्हा उत्तरे खूप काळजीपूर्वक, नियोजनबद्ध व विशिष्ट मांडणीत लिहिणे आवश्यक असते. त्याकरिता उत्तरे लिहिण्याचा सुनियोजित सराव करा.

हा सराव फक्त दहावी परीक्षेपुरताच नव्हे तर पुढील सर्व शिक्षणामध्ये तुम्हाला नक्कीच कामी पडणार आहे. चला तर मग सुरुवात करू या... आदर्श उत्तरे लिहून, आदर्श बनूया!!!

(डेमो पिक)