आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियातील मोहिमेमुळे १३ दिवसांत २०% घटली चायना मेड वस्तूंची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियावर चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाचा परिणाम होताना दिसत आहे. सणासुदीचे दिवस असतानादेखील गेल्या १३ दिवसांत या उत्पादनांची मागणी २० टक्क्यांनी कमी झाली असल्याचा दावा व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ म्हणजेच कॅटने केला आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यानंतर चीनने भारतविरोधी भुमीका घेतली होती, त्यानंतर सोशल मीडियामध्ये चिनी वस्तू खरेदी करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. चिनी वस्तूंची विक्री १० ते १५ टक्के जरी कमी झाली तरी व्यापाऱ्यांना आपली गुंतवणूक काढणेदेखील अवघड होईल. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
दिवाळीच्या काळात चायनीज लायटिंगसारख्या वस्तू देशभरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असल्याचे कॅटचे सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. त्यामुळे सुमारे तीन महिने आधीच अशा सामानाची आयात होते. सध्या चायना मेड सामान घाऊक विक्रेत्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची मागणी २० टक्के कमी झाली आहे. लोक खरंच या वस्तू खरेदी करतील की नाही, अशी शंका त्यांना वाटत आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्काराचा खरा परिणाम नवीन वर्ष आणि ख्रिसमसमध्ये दिसेल, असेही खंडेलवाल यांनी सांगितले. दिवाळीत या सामानाची विक्री झाली नाही तर घाऊक व्यापारी नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या काळात चीनला ऑर्डर देणार नाहीत.

दिल्लीतील व्यापाऱ्यांनी १५० कोटींची ऑर्डर केली रद्द
दिल्लीतील चांदणी चौकाव्यतिरिक्त नोएडामध्ये चायना मेड उत्पादनांचा मोठा बाजार आहे. येथील व्यापारी चीनला विरोध करण्यासाठी नुकसान सहन करायलादेखील तयार आहेत. आधी देशाचे हित, नंतर व्यवसाय, असे त्यांचे म्हणणे आहे. बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंची १५० कोटी रुपयांची ऑर्डर रद्द केली असल्याचे दिल्ली व्यापारी संघाचे अध्यक्ष देवराज बवेजा यांनी सांगितले.

परिणाम नाही, चीनचा दावा
भारतातील या मोहिमेचा विक्रीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचा दावा चीनने केला आहे. बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी सणासुदीच्या दिवसांत भारतात चिनी वस्तूंची विक्रमी विक्री होत असल्याचा दावा चीनमधील सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने केला आहे.
चीनमधून आयात
{ मोबाइल फोन, लॅपटॉप, की-बोर्ड, सौर लाइट
{ खेळण्या, एलईडी लाइट, सेट-टॉप बॉक्स
{ इलेक्ट्रिकल मशिनरी प्लास्टिक उत्पादने
{ औषधी, फटाके आणि सजावटीच्या वस्तू आदी.
चीनला निर्यात
{ कापूस
{ कॉपर
{ पेट्रोलियम व इंडस्ट्रियल मशिनरी
बातम्या आणखी आहेत...