आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media Should Be Free, Its Not Miuse Manmohan Singh

सोशल मीडिया स्वतंत्र असावा, दुरुपयोग होऊ नये - मनमोहनसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुजफ्फरनगर दंगलीनंतर झालेल्या राष्‍ट्रीय एकात्मता परिषदेत दंगल भडकण्याची कारणे आणि चिथावणीखोरांवर चर्चा होणे क्रमप्राप्तच होते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोशल मीडियाच्या स्वातंत्र्याची बाजू मांडली. परंतु त्याचा दुरुपयोग होऊ नये, असा सल्लाही दिला.


वास्तविक पंतप्रधानांच्या टीकेचा रोख भाजपच्या दिशेने होता. मुजफ्फरनगर दंगलप्रकरणी भाजप आमदार संगीत सोम यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्याचा आरोप आहे. याच प्रकरणात ते सध्या तुरुंगात आहेत. अर्थात पंतप्रधानांनी कोणाचाही नामोल्लेख केला नाही. परंतु ते म्हणाले, अलीकडेच जातीय दंगलीत विद्वेष पसरवण्यासाठी बनावट व्हिडिओचा वापर झाला आहे. आधीही असे घडले आहे. त्यामुळे अशा खोडसाळ शक्तींना सोशल मीडियाचा दुरुपयोग करण्यापासून रोखले पाहिजे. सोशल साइट्सवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही व्यक्त केले.


पंतप्रधान म्हणाले, दंगल रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने तसेच सक्तीने कारवाई केली पाहिजे. दोषी व्यक्ती कितीही बड्या असल्या किंवा कोणताही धर्म, राजकीय पक्षाशी संलग्न असल्या तरीही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करता कामा नये. तसे झाले तरच लोकांचा सरकारवरील विश्वास कायम राहील. कायद्यावरील विश्वास डळमळीत होणार नाही.


अत्याचार थांबल्याशिवाय देशाची प्रगती नाही : शिंदे
महिलांवर होणा-या अत्याचाराच्या घटना थांबल्याशिवाय देश ख-या अर्थाने प्रगती करू शकणार नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. महिला तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांना अद्यापही समाजात बरोबरीचा दर्जा मिळत नाही. त्यांच्यावर अत्याचार सुरूच आहेत, असे शिंदे म्हणाले. दरम्यान, टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू यांनी बैठकीत तेलंगणाच्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु शिंदेंनी त्यांना मध्येच अडवले. त्यामुळे नाराज झालेले नायडू बैठक अर्धवट सोडून निघून गेले.


मोदींची बैठकीला दांडी
बैठकीत भाजपचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भाग घेतला, परंतु गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी बैठकीस दांडी मारली. मोदींच्या अनुपस्थितीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री मनीष तिवारींनी त्यांचे नाव न घेता जर सामाजिक सद्भावनेवर त्यांचा विश्वास असता तर ते नक्की आले असते, असे मतप्रदर्शन केले.


अडवाणी-नितीशकुमार भेट
बैठकीसाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आले होते. अडवाणींनी नितीशकुमार यांची प्रसन्न मुद्रेने हसत - हसत भेट घेतली. हस्तांदोलन करून त्यांच्याशी थोडीशी चर्चाही केली. अडवाणी - कुमार भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यावर लगोलग खुलासा करताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, भाजपचे नेते विरोधकांशीदेखील शिष्टाचाराने वागतात. त्यांच्याशी हस्तांदोलन करताना किंवा बोलताना त्यांना काहीच अडचण वाटत नाही.