आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर जिल्हा देशाच्या पर्यटन नकाशावर, तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 43 कोटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी केंद्रीय पर्यटनमंत्रालयाने सुमारे 43 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून यातील साडेचार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री के. चिरंजीवी यांनी मंगळवारी या प्रकल्पास मंजुरी दिली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्हा आणि परिसर देशाच्या पर्यटन नकाशावर आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर या शहरांना तर उस्माबाद जिल्ह्यातील तुळजापूर या शहरांच्या विकासासाठी हा निधी वापरला जाणार आहे. सोलापूर मेगा सर्किट या नावाने हा प्रकल्प ओळखला जाणार असून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी धार्मिक पर्यटनासाठी आवश्यक असणार्‍या सुविधांचा विकास करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी राज्य सरकारकडून मोफत जमीन उपलब्ध करण्यात येणार असून यावर केंद्र सरकारच्या निधीतून
विकासकामे करण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका निगराणी समितीची स्थापनाही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हा निधी वापरण्यात येणार आहे. पंढरपूर,तुळजापूर आणि अक्लकोट येथे निवासाची सुविधा तसेच इतर आवश्यक सुविधांचा विकास करणे अपेक्षित आहे. याशिवाय मेगा सर्किटच्या क्षेत्रात प्रवासाची सुविधा अधिक तत्पर आणि सोपी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

तीर्थक्षेत्रांचा विकास
> विठ्ठल मंदिर आणि परिसरात एमटीडीसीच्या अधिकाधिक सुविधा
> चंद्रभागा नदीच्या परिसरात विकासकामे
> पंढरपूरच्या वारी पर्यटनाचा पॉइंट म्हणून मार्केटिंग करणार
> तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास
> पर्यटकांसाठी निवासव्यवस्था आदींची कामे
> सिद्धरामेश्वराचे सोलापूरही विकासकामांच्या अजेंड्यावर
> स्वामी समर्थ मंदिर परिसरात अधिक सुविधा उपलब्ध होणार