आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या राज्यात मनोमनी भीती, दबाव : सोनिया गांधींची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे स्वत:ला सुशासन व घटनात्मक मूल्यांची जपणूक करणारा नेता असल्याचे दाखवू पाहतात. तर दुसरीकडे त्यांनी आपल्या नेत्यांना भडक वक्तव्ये करण्याची जणू मुभाच दिली आहे, असा दुहेरी खेळ कंेद्र सरकारने चालवला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी हल्लाबोल केला.

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परिषद सोमवारी दिल्लीत झाली. या परिषदेत बोलताना सोनियांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. काँग्रेसने राबवलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाला मोदी सरकारने हरताळ फासला असल्याची टीका त्यांनी केली. या सरकारने मुद्दाम भीती आणि दबावाचे वातावरण देशात निर्माण केले असल्याचे सोनिया म्हणाल्या.लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांची ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या एक दिवसीय परिषदेत मोदी सरकारचे अपयश लोकांसमोर मांडून या सरकारविरुद्ध पूर्ण क्षमतेने राजकीय लढाई लढण्याबाबत चर्चा करण्यात आली. काँग्रेस मुख्यालयात आयोजित या परिषदेला केरळ, कर्नाटक, आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

मार्केटिंग कौशल्य सुधारा
गेल्या निवडणुकीवरून आपण एक बोध घेतला. सध्या तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मार्केटिंगचे कौशल्य सुधारून जनतेपर्यंत पोहोचण्याच्या पद्धती अंगीकाराव्यात. यातून लोकांशी संवाद वाढवण्याची गरज असल्याचे सोनिया म्हणाल्या. राज्य सरकारचे यश जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच असल्याचेही त्या म्हणाल्या.

परदेशातही राजकारण...
मोदींनी लोकशाही व्यवस्थेचे धिंडवडेच काढले आहेत. राजकीय परंपरांना छेद देत त्यांनी परदेशात बोलतानाही खालच्या पातळीचे राजकारण चालवले आहे. एकीकडे निवडणूक प्रचारात मोदींनी मोठमोठी आश्वासने दिली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीच अंमलबजावणी त्यांनी केली नसल्याचेही सोनियांनी नमूद केले.

नेहरूंचा वारसा जपा
केंद्रातील मंडळी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पडद्यामागील शक्ती सध्या पंडित नेहरूंचा वारसा नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. नेहरूंच्या विचारांना तिलांजली देण्याचा जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहे. काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी या शक्तींचा मुकाबला करताना पंडित नेहरूंचा वारसा जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत, असे आवाहन सोनिया यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

एकहाती सत्ता केंद्रित
पंतप्रधान मोदी देशाची सत्ता एका हातात केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भारतीय घटनात्मक मूल्य व परंपरा मोडून यातील प्रक्रियांचेही उल्लंघन होत आहे. सामाजिक क्षेत्रातील लोक व न्यायपालिकेलाही धमकावले जात आहे. राज्यांवर अवास्तव आर्थिक ओझे लादले जात असल्याची टीका सोनिया यांनी केली.