आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावपेच: काँग्रेसला सांभाळण्यासाठी सोनिया गांधी आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत सर्वात मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर काँग्रेसने त्यापासून धडा घेत आपली व्यूहरचना नव्याने सुरू केली आहे. पक्षाने पुन्हा एकदा कथित धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्याची तयारी केली आहे. त्याचे नेतृत्व खुद्द सोनिया गांधीच करत आहेत. सोनियांच्या सूचनेनंतर पक्षाचे नेते सपा आणि बसपासारख्या पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुलायमसिंह यादव यांच्याशी चर्चा केली आहे. मंगळवारी लोकसभेत मुलायम आणि सोनिया एकमेकांच्या शेजारच्या आसनांवर बसले होते. इतर राज्यांमध्येही कथित धर्मनिरपेक्ष पक्षांना कसे एकत्रित आणता येईल याची चाचपणी केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनाही विविध माध्यमांतून संदेश दिले जात आहेत. विरोधी पक्ष एकत्रित आले नाहीत, तर सत्ताधारी त्यांना विशेष महत्त्व देणार नाही, असे काँग्रेसच्या काही नेत्यांचे मत आहे. विशेषत: लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदावरून भाजपचा दृष्टिकोन काँग्रेसला आवडलेला नाही. संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांचे वक्तव्य काँग्रेसला फारसे रुचलेले नाही. विविध मुद्दय़ांवर आक्रमक भूमिका घ्यावी, अशी सूचना सोनियांनी आपल्या रणनीती ठरवणार्‍या नेत्यांना केली आहे. खासदारांसाठी आयोजित स्नेहभोजनाच्या वेळीही त्यांनी हीच सूचना विशेषत्वाने केली होती.
राहुलना अभिनंदन करण्यासाठी पाठवले
खारगे यांचा आक्रमक पवित्रा सोनिया गांधी यांना खूप भावला. सोनियांनी त्यांचे स्वत: तर अभिनंदन केलेच शिवाय राहुल गांधी अभिनंदन न करताच सभागृहाबाहेर जात होते, तेव्हा त्यांना थांबण्यास सांगून खारगेंचे अभिनंदन करण्यासाठी पाठवले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर त्यांनी भाषण केले होते.

लोकसभेत नवी रणनीती तयार करण्याचा प्रयत्न
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजप खासदार राजीव प्रताप रुडी काँग्रेसवर जोरदार हल्ला करत होते. त्या वेळी सोनिया मल्लिकार्जुन खारगे व इतर नेत्यांना सल्ला देत होत्या. खारगेंच्या भाषणादरम्यान सोनियांनी शिक्षणाच्या हक्कासोबतच माहितीच्या हक्काचाही उल्लेख करण्यास सुचवले होते.
अर्थात, खारगेंना ते ऐकू गेले नाही आणि ते आपल्याच आवेशात बोलत राहिले.

निवडणूक होणार्‍या राज्यांची चिंता
सोनियांनी खासदार आणि पक्ष नेत्यांना सांगितले आहे की, जर विरोधी पक्ष म्हणून आपण आक्रमकरीत्या मुद्दे मांडले नाहीत, तर हरियाणा, महाराष्ट्रासह ज्या राज्यांत लवकरच निवडणूक होणार आहे तेथील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढणार नाही. सोनिया गांधींनी लोकसभेत पूर्णपणे आघाडी सांभाळली आहे. राहुल गांधी मात्र या आघाडीवर कुठेच दिसत नाहीत.