नवी दिल्ली- कॉंग्रेस हाच सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे आम्हालाच विरोधीपक्ष नेतेपद मिळावे असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी म्हटले. यापूर्वी लोकसभेत कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी विरोधीपक्षनेते पदाची मागणी लावून धरली होती. मात्र, सत्तेत आलेल्या भाजपने कॉंग्रेसला विरोधीपक्षनेतेपद देण्यास नकार दिला आहे.
लोकसभेत सध्या कॉंग्रेसचे 44 खासदार आहेत. मात्र, विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी किमान 55 खासदार अर्थात लोकसभा सदस्यांची आवश्यकता असते. या पाश्वभूमीवर कॉंग्रेसकडे 11 सदस्य कमी आहेत.
दुसरीकडे, या मुद्यावर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे सुमित्रा महाजन या मोदी सरकार आणि भाजप नेत्यांच्या दबाबत येऊन निर्णय घेऊ शकतात, अशी साशंकता कॉंग्रेसला आहे. विरोध पक्षनेतेपद न मिळाल्यास कोर्टात दाद मागणार असल्याचे कमलनाथ यांनी इशारा दिला आहे.
सोनिया गांधी म्हणाल्या, सध्या संसदेत कॉंग्रेस हाच सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही आघाडी केली होती. यामुळे लोकसभेचे विरोधीपक्षनेतेपद आम्हालाच मिळाले पाहिजे.
दरम्यान, कॉंग्रेसने विरोधपक्षनेतेपदाचा मुद्दा उकरून काढू नये, असे संसदीय कार्यमंत्री एम व्यकंया नायडू यांनी म्हटले आहे. संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत व्यकंय्या नायडू यांनी सांगितले, की कॉंग्रेसने विरोधपक्षनेतेपदाचा मुद्दा उकरून काढणे योग्य नव्हे.
(फाइल फोटो)