आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अय्यर म्हणाले, महिला कार्यकर्त्यांनी ठरवल्यास मोदींना समुद्रापर्यंतही ढकलता येईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो: काँग्रेसच्या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना सोनिया गांधी.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ठरवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना समुद्रापर्यंत ढकलून लावता येईल, असे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले.
अय्यर म्हणाले की, कांग्रेसकडे खास निवडलेल्या अशा 14 लाख महिला आहेत. फक्त त्यांना एकत्र आणण्याची गरज आहे. जर या सर्व महिला एकजूट झाल्या, तर मोदींना गांधीनगरला परत जावे लागेल असे अय्यर म्हणाले. एवढ्यावरच न थांबता, या महिलांनी आणखी थोडा जोर लावला तर, मोदींना समुद्रापर्यंतही ढकलता येऊ शकते, असेही ते म्हणाले. अय्यर यांनी यापूर्वीही मोदींवर चहावाला अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणार टीका झाली होती.

सोनियांचा हल्लाबोल
यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले. सोनिया म्हणाल्या की, सध्याचे सरकार, युपीए सरकारच्याच योजनांवरच अंमलबजावणी करत आहे. महिला आरक्षणाचा मुद्दा उचलून धरताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस महिला आरक्षणाच्या मुद्यावर तसूभरही मागे हटणार नाही. आम्ही मोठ्या प्रमाणावर काम केले. पण ते जनतेसमोर आम्हाला मांडता आले नाही, त्यामुळे लोक इतर काही लोकांच्या फसव्या आश्वासनांना भुलले. परिणामी खोटी स्वप्ने दाखवणारे पुढे निघून गेले असेही त्या म्हणाल्या. यावेळी सोनियांनी नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही टीका केली. निर्मल भारत अभियानाची सुरुवात यूपीए सरकारच्या कार्यकाळातच झाली होती, हे सर्वांनाच माहिती आहे, असे त्या म्हणाल्या.
महिलांना मार्गदर्शन करताना सोनिया म्हणाल्या की, काँग्रेस नेत्यांनी नेहमीच महिला सबलीकरणाच्या दिशेने काम केले असल्याचा मला अभिमान आहे. काँग्रेस महिला आरक्षणाच्या मुद्यावर नेहमीच आक्रमक राहणार असून या विधेयकासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याचेही त्या म्हणाल्या.