आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनियांची विजयी त्रिसूत्री : संसदीय पक्षाच्या बैठकीत नेते, खासदारांना मार्गदर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे. निवडणुकीत विजयी होण्यासाठी आत्मविश्वास, व्यावसायिकता आणि उत्साह ठेवा, अशी त्रिसूत्री काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीत त्या मंगळवारी मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास आणि उत्साह ठेवल्यास पक्षाचा निश्चित विजय होईल. भाजपने संसदेत अतिशय असभ्य भाषेतून आरोप तंत्राचा वापर केला आहे. सुज्ञ नागरिकांना हे लोक ओळखतात. सभागृहाबाहेर देखील भाजपने काँग्रेसविरुद्ध अपप्रचार केला आहे. काँग्रेसने चर्चेचा मार्ग निवडला; परंतु भाजपने चर्चादेखील होऊ दिली नाही. त्यामुळे निवडणुकीत जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने असेल, असा विश्वास सोनियांनी व्यक्त केला.

विश्वसनीय तपासाची मागणी- तामिळींवरील अन्यायाचा तपास व्हायला हवा, अशी मागणी सोनियांनी केली. डीएमकेने यूपीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोनियांनी पक्षाची ही भूमिका मांडताना हे वक्तव्य केले आहे. सरकारने कायम राजकीय हक्क डावलले आहेत, अशी वेदना श्रीलंकेतील तामिळी नागरिक नेहमी व्यक्त करतात.

चार पानी भाषण- सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत आपल्या चार पानांच्या भाषणातून अनेक मुद्द्यांना उपस्थित केले. पक्षापुढील राजकीय आव्हाने, महिला अत्याचारविरोधी विधेयकासह महत्त्वाच्या विधेयकांवरील बांधिलकी यावर त्यांनी ऊहापोह केला.

इटलीवर भडकल्या- खलाशी प्रकरणात सोनिया गांधी आपल्या भाषणातून इटलीवर चांगल्याच भडकल्या. इटली सरकारने विश्वासघात केला आहे. जोपर्यत खलाशी भारतात परत पाठवले जात नाहीत, तोपर्यंत इटलीसोबत कोणत्याही प्रकारच्या तडजोडीचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे सोनियांनी स्पष्ट केले. सर्वाच्च् न्यायालयाला दिलेले वचन मोडल्याबद्दल त्यांनी इटली सरकारचे कान उपटले. कोणत्याही देशाने भारताला गृहीत धरू नये. इटलीने अगोदर इतर देशांच्या न्यायसंस्थेचा आदर केला पाहिजे, असे सोनिया म्हणाल्या. गांधी या मूळच्या इटलीच्या असल्यावरून त्यांच्यावर आरोप होतात. त्या पार्श्वभूमीवर सोनियांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.