आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia, Modi In Kejriawal Beman List, Sibbal Said If Charges Prove Then Take Sanyas

केजरीवाल यांच्या ‘बेइमान’ यादीत मोदी, सोनियाही;स‍िब्बल म्हणतात आरोप सिध्‍द झाल्यास संन्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ‘बेइमान’ नेत्यांच्या यादीत भर टाकत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही नाव समाविष्ट केले. हे दोघेही भ्रष्ट असल्याचे ‘आप’ने म्हटले नसले तरीही त्यांच्यावर द्वेषाचे राजकारण करणे आणि घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. टीम केजरीवालच्या या कारनाम्यावर काँग्रेस-भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने आम आदमी पार्टी स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे गंभीर आरोप करत असल्याचे नमूद केले. तर, केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आपल्यावरील आरोप सिद्ध केल्यास संन्यास घेतो, असे प्रतिआव्हान केजरीवाल यांना दिले आहे.
‘आप’चे प्रवक्ते गोपाल राय यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मोदी, सोनियांचा समावेश बेइमान नेत्यांच्या यादीत का केला याची कारणे सांगितली. लोकांकडून फीडबॅक घेतल्यानंतरच सोनिया आणि मोदींचे नाव यादीत जोडले असल्याचे ते म्हणाले. सोनिया भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट पक्षाच्या प्रमुख म्हणून मिरवत असून त्यांना संरक्षण देत आहेत. तर मोदी हे द्वेषाचे राजकारण करत आहेत, असे राय म्हणाले. केजरीवाल यांनी शुक्रवारी राष्‍ट्रीय परिषदेच्या बैठकीत 29 भ्रष्ट नेत्यांची नावे जाहीर केली होती. हे नेते बेइमान असल्याचे सांगत निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचे आवाहन जनतेला केले होते. या यादीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अर्थमंत्री पी. चिदंबरम, भाजप नेते नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख पक्षनेत्यांचा समावेश होता. यावर नितीन गडकरी व कपिल सिब्बल यांनी कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.
केजरीवालांचे पुतळे जाळले
केजरीवालांनी केलेल्या आरोपांचा निषेध म्हणून देशभरात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले. चेन्नई व कोईमतूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केजरीवालांचा पुतळा जाळून त्यांचा निषेध केला.
नेत्यांचा ‘आप’वर संताप
‘आप’ने केलेल्या या नव्या हल्ल्यानंतर शनिवारी अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिहल्ला चढवला. काँग्रेस नेते कपिल सिब्बल म्हणाले, ‘केजरीवाल यांनी माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एक आरोपही सिद्ध केला तर मी राजकारणातून संन्यास घ्यायला तयार आहे. आरोप सिद्ध न केल्यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.’ भाजप नेते व्यंकय्या नायडू म्हणाले ‘केजरीवाल स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठीच असे आरोप करत आहेत.’ भाजप नेते नितीन गडकरी यांनी तीन दिवसांत केजरीवालांनी जाहीर माफी मागितली नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा याआधीच दिला आहे.