आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटकबाजी करण्यात सुषमा तरबेज सोनिया गांधींचा आरोप, राहूलने मागितला हिशेब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेतील तिढा सुटण्याऐवजी काँग्रेस व भाजपमधील कटुता वाढतच चालली आहे. २५ काँग्रेस खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात धरणे आंदोलन करत असलेल्या सोनिया गांधी यांनी ललितगेट प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर शुक्रवारी प्रतिहल्ला चढवला. ‘नाटकबाजीत सुषमा तरबेज आहेत,’ असे सोनिया म्हणाल्या. त्यानंतर राहुल गांधींनीही लक्ष्य केले. ‘तुरुंगाबाहेर ठेवण्यासाठी ललित मोदींकडून सुषमांनी पैसे घेतले. त्यांच्याकडून किती पैसे मिळाले हे सुषमांनी देशाला सांगावे, असे राहुल म्हणाले.

ललित मोदींच्या प्रकरणावर गुरुवारी लोकसभेत भावनिक निवेदन करताना सुषमांनी ‘माझ्या जागी तुम्ही असता तर काय केले असते?,’ असा सवाल सोनियांना केला होता. त्यावर सोनिया म्हणाल्या, ‘मीही त्या महिलेला (ललित मोदींची पत्नी ) माझ्या परीने मदत केली असती; पण कायद्याचे उल्लंघन केले नसते.’ तर राहुलनी सुषमांच्या जागी सोनियाजी असत्या तर त्यांनी कधीच असे केले नसते, असे म्हटले आहे.
त्यानंतर सुषमांच्या बचावासाठी भाजपने स्मृती इराणींना मैदानात उतरवले. असे विधान करून सोनियांनी भाजपला मिळालेल्या जनादेशाचा अवमान केला. संसदेची अप्रतिष्ठा केली. काँग्रेस नेते दीड मिनिटांचे बाइट देतात, पण सभागृहात दीड तास चर्चा करू शकत नाहीत, असे स्मृती म्हणाल्या.

कोरमअभावी अडकले लोकसभेचे कामकाज
मोदी सरकारवर शुक्रवारी लोकसभेत नामुष्की ओढवली. लोकसभा कामकाजासाठी ५५ सदस्यांचा कोरम आवश्यक असतो. परंतु एकावेळी फक्त ४५ सदस्य होते. विरोधकांचा बहिष्कार आहे. मध्यान्हानंतर तीन वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा सत्ताधारी बाके रिकामी होती. फ्लोअर्स मॅनेजर्सनी सदस्यांना बोलावून घेतले तेव्हा ३.२५ वाजता कामकाज सुरू झाले. या दरम्यान २५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित करावे लागले.

राज्यसभेचे कामकाज सलग तिसऱ्या आठवड्यातही ठप्प
ललित मोदी आणि व्यापमं घोटाळाप्रकरणी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर अडून बसलेल्या काँग्रेसमुळे राज्यसभेत पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात कामकाज होऊ शकले नाही. शुक्रवारी अधिवेशनाच्या १४ व्या दिवशीही राज्यसभेत शून्य प्रहर व प्रश्नोत्तरांचा
तास झाला नाही. सरकार मागणीप्रमाणे प्रस्ताव मांडत नाही तोपर्यंत कामकाज होणार नाही, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले.

विरोधक आक्रमकच २५ काँग्रेस खासदारांच्या निलंबनामुळे लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकून धरणे देत असलेले विरोधी पक्ष शुक्रवारी आणखी आक्रमक झाले. सरकारविरुद्ध घोषणाबाजी करत संसद परिसर दणाणून सोडला आणि विरोधाची वज्रमूठ कायम असल्याचे दाखवून दिले.भूसंपादन विधेयक पुढच्या आठवड्यात लोकसभेत : संशोधित भूसंपादन विधेयक पुढील आठवड्यात लोकसभेत मांडले जाऊ शकते. संयुक्त संसदीय समितीला ११ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विधेयकातील सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवर समितीचे एकमत झाले आहे. सामाजिक प्रभाव मूल्यमापन आणि जमीन मालकांच्या संमतीच्या अटीची तरतूद या विधेयकात समाविष्ट करण्यास मोदी सरकार राजी झाले आहे. पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टला संपणार आहे.