आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • STING OPERATION: Trinamool Congress Leaders 'caught On Camera Accepting Cash' Watch

आचारसंहिता समिती करणार खासदारांच्या स्टिंगची चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी कथितरीत्या लाच घेतल्याच्या प्रकरणाची चौकशी लोकसभेची आचारसंहिता समिती करेल. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी बुधवारी ही घोषणा केली. ‘आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे संसदेच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे,’ अशी टिप्पणी महाजन यांनी केली.

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच महाजन यांनी ही घोषणा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे आचारसंहिता समितीचे अध्यक्ष असून समितीत १५ सदस्य आहेत. या प्रकरणी भाजप, काँग्रेस आणि माकपने मंगळवारी एकत्रितरीत्या तृणमूलवर जोरदार हल्ला करत चौकशीची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी एका न्यूज पोर्टलवर स्टिंग ऑपरेशन दाखवण्यात आले होते. त्यात तृणमूलच्या १२ नेत्यांना लाच घेताना दाखवण्यात आले होते. एका कंपनीला फायदा व्हावा यासाठी त्या बदल्यात पैसे घेण्यात आले, असे म्हटले होते. ज्यांच्यावर लाचेचा आरोप आहे त्यात सौगत रॉय, सुलतान अहमद, सुवेंदू अधिकारी, काकोली घोष दस्तीदार, प्रसून बॅनर्जी (सर्व लोकसभा खासदार) आणि राज्यसभा खासदार मुकुल रॉय यांच्यासह पश्चिम बंगालमधील काही मंत्री, आमदार आणि महापौर यांचा समावेश आहे.

पैशाच्या बदल्यात प्रश्न
लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे २००५ मधील ‘कॅश फॉर क्वेरी’ (पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारणे प्रकरणाची आठवण झाली आहे. त्यात ११ खासदारांचे सदस्यत्व संपुष्टात आले होते. त्यात लोकसभेचे १०, राज्यसभेच्या एका सदस्याचा समावेश होता. त्या वेळी सोमनाथ चटर्जी लोकसभेचे अध्यक्ष होते.

राज्यसभेतही प्रकरण उपस्थित
तृणमूलच्या खासदारांनी कथितरीत्या लाच घेतल्याचे प्रकरण बुधवारी राज्यसभेत उपस्थित झाले तेव्हा तृणमूल आणि माकप सदस्यांचा जोरदार खडाजंगी झाली. हा मोठा घोटाळा आहे असे म्हणत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरींनी चौकशीची मागणी केली.
कोलकात्यात महापौरांच्या राजीनाम्याची मागणी
कोलकाता - माकप, काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी बुधवारी कोलकाता महापालिकेच्या अंतरिम अर्थसंकल्पीय सभेत जोरदार गोंधळ घातला. त्यांनी स्टिंगप्रकरणी महापौर सोवान चटर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महापौरांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरा लावावा, अशी मागणीही त्यांनी केली.
पितळ उघडे पडणार
> पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील हा कट आहे. माध्यमांतील एक गटही विरोधी पक्षांसोबत आहे. मी नंतर त्यांचे पितळ उघडे पाडणार आहे.
- ममता बॅनर्जी, तृणमूलच्या प्रमुख
..तर कुणाचेही स्टिंग
> ही एकतर्फी कारवाई आहे. अशीच परंपरा कायम राहिली तर कुणीही संसद सदस्यांचे स्टिंग करेल आणि त्याची चौकशी होईल. हे प्रकरण एप्रिल २०१४ चे आहे. त्या वेळी तर सध्याच्या लोकसभेचे गठनही झाले नव्हते.
- सौगत रॉय, खासदार, तृणमूल काँग्रेस